Panvel Vidhansabha: प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात नेमके कोण?
पनवेल ता.29(बातमीदार) मंगळवार ता 29 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायची शेवटची तारीख होती. या दिवशी बाळाराम पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी शेकाप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन अर्ज भरले.
त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात मुख्य विरोधी उमेदवार कोण असेल हा सस्पेन्स कायम आहे. अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी स्थिती नाही. कांतीलाल कडू आणि योगेश चिले हे सुद्धा निवडणूक रिंगणामध्ये आहेत.
पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना डमी म्हणून पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी सुद्धा आपला अर्ज दाखल केला. या मतदारसंघांमध्ये प्रशांत ठाकूर यांची उमेदवारी ही निश्चितच होती.मात्र त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी नेमके कोणाला उतरवते हे चित्र शेवटच्या तारखेपर्यंत स्पष्ट झाले नाही.

