परमबीर सिंह यांच्यावर पत्र लिहिण्यासाठी दबाव?

Parambir-Singh-Letter
Parambir-Singh-Letter

महाराष्ट्रात गेले काही दिवस राजकीय वातावरण तणावपूर्ण आहे. सुरूवातीला महाराष्ट्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली. त्यानंतर त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक झाली. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदलीनंतर पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री पोलीसांकरवी खंडणी वसूल करायला लावत असल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधक गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतानाच, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी केली जावी अशी याचिका सुप्रीम कोर्टाचत दाखल केली आहे. या साऱ्या प्रकरणावर आज काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

- माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी अशी कोर्टाला विनंती केली आहे. त्याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. "मूळात परमबीर सिंह यांच्यावर पत्र लिहिण्यास दबाव टाकण्यात आला असं आम्हाला असं वाटतं आहे. शरद पवार स्वत: या प्रकरणात लक्ष घालत आहेत आणि आम्ही तीन पक्ष एकत्र चर्चा करू आणि ठरवू. पत्र म्हणजे एक षडयंत्र आहे. आधीदेखील असे प्रयत्न भाजपने खूप वेळा केले आहेत", असं ते म्हणाले.

- "कोणत्या अधिकाऱ्याने पत्र लिहिले म्हणून मंत्र्याने राजीनामा द्यावा असं झालं तर ते चुकीचं असेल. परमवीर सिंह यांनी बदली झाल्यावर पत्र लिहिले त्यामुळे त्यांच्या हेतूवर शंका निर्माण होत आहे. पत्र लिहिण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? हे ही स्पष्ट झाले पाहिजे", असं ट्वीटही त्यांनी केलं.

- "एखाद्या अधिकाऱ्याने एक पत्र लिहिलं म्हणून लगेच एखाद्या मंत्र्याची थेट चौकशी केली जावी असं म्हणणं योग्य नाही. भाजप हा विरोधी पक्ष आहेत. सत्ता नसल्याने ते अस्वस्थ आहेत. सध्याच्या घटना ही राज्यात सत्ता मिळवण्यासाठीची उत्तम संधी आहे असा त्यांचा समज असल्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी सातत्याने केली जात आहे", असा टोला थोरात यांनी भाजपला लगावला.

- परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस दलाच्या आयुक्त पदावरून का हटवलं? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. "अधिकाऱ्यांची बदली या विषयावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. हा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय योग्यच आहे", असं ते म्हणाले.

- "सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडी पाहता राष्ट्रपतींनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सर्व गोष्टींबद्दल एक अहवाल मागवावा असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या युतीच्या कालखंडातही अशा अनेक घटना घडल्या होत्या, प्रश्न उपस्थित झाले होते. पण त्यावेळी मात्र अशा प्रकाराचे अहवाल पाठवण्यात आले नाहीत. याचा एकच अर्थ होतो की सुधीर मुनगंटीवार हे सत्ता नसल्याच्या अस्वस्थेतून सारं काही बोलत आहेत", असा घणाघात त्यांनी केला.

- सकाळी वर्षा बंगल्यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे भेटीसाठी गेले होते. त्या भेटीत उद्धव ठाकरेंशी काय बोलणं झालं हे सांगण्यास मात्र थोरातांनी नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com