esakal | 'लेटरबॉम्ब'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; दिले गुजरातचे संदर्भ
sakal

बोलून बातमी शोधा

parambir singh letter congress sachiv sawant reaction anil deshmukh

काल राज्यात इतकी मोठी राजकीय घडामोड झाल्यानंतरही काँग्रेसकडून कोणतिही प्रतिक्रिया आली नाही. आज, काँग्रेसचे राज्यातील प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली.

'लेटरबॉम्ब'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; दिले गुजरातचे संदर्भ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आज, सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन पुकरले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून सरकार आहे. राष्ट्रवादीकडे गृहखाते आहे. तर, मनसूख हिरेन प्रकरणात निलंबित झालेले पोलिस अधिकारी सचिन वाझे, शिवसेनेशी संबंधित आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काल राज्यात इतकी मोठी राजकीय घडामोड झाल्यानंतरही काँग्रेसकडून कोणतिही प्रतिक्रिया आली नाही. आज, काँग्रेसचे राज्यातील प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली. एखाद्या राज्यात विरोधी पक्षाचं सरकार असेल तर, ते पाडण्यासाठी भाजपकडून अशा प्रकारचं षडयंत्र राबवलं जात आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचंही ते म्हणाले.

आणखी वाचा - तो ई-मेल माझाच; परमबीर सिंग यांचं स्पष्टीकरण

काय म्हणाले सचिन सावंत?
सचिन सावंत म्हणाले, 'महाराष्ट्रात असं  जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केलं जात आहे. जिथं जिथं विरोधी पक्षांचं सरकार आहेत. तिथं केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून असं केलं जात आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटकमध्येही सत्ता परिवर्तन करून घेतलं. सत्ता बळकावायची जनतेनं कौल दिला नसला तरी गैरमार्गानं सत्ता हाती घ्यायची, असा प्रकार आपण मध्य प्रदेशातही पाहिला आहे. भाजपनं स्वतःसाठी वेगळा आणि इतर पक्षांसाठी वेगळा न्याय, अशी दुटप्पी भूमिका घेत आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातही तीन-तीन राष्ट्रीय तपास यंत्रणा मुंबईत आणल्या आणि महाराष्ट्र पोलिसांची बदली केली. या सगळ्या प्रकारामागं राजकीय अजेंड्यासाठी सगळ्याचा वापर केला जात आहे. गोदी मीडिया नावाचा प्रकार, जो सुरू झाला आहे. त्या मीडियाच्या माध्यमातून भाजप त्यांचा अजेंडा राबवत आहे. काल अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर तर, मीडियानं न्याय दानाची प्रक्रिया पारच केली.'

आणखी वाचा - लेटरबॉम्ब विषयात आता अमृता फडणवीस यांची उडी

अमित शहांनी काय केलं?
गुजरातचे माजी पोलिस महासंचालक वंजारा यांनी राज्याचे तात्कालीन गृहमंत्री अमित शहांवर याहून गंभीर आरोप केले होते. पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण, त्यावेळी अमित शहांनी कुठं राजीनामा दिला? असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला. सावंत म्हणाले, 'कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं वातावरण निर्माण केलं जातं, हे भाजपच्या कटाचा भाग आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकऱ्यांवर केंद्राचा दबाव आहे. महाराष्ट्रातील असेच एक अधिकारी सत्यपाल सिंह कसे नंतर भाजपला जाऊन सामील झाले हे आपण पाहिलं आहे. हा सगळा प्रकार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.'

मुंबईच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सचिन सावंत यांनी उपस्थित केलेले प्रश्न

  • आरोप झाल्या झाल्या भाजप नेते कसे मीडिया बाईट द्यायला येतात
  • आरोपांची सगळी माहिती त्यांना आधीच होती का?
  • गुजरातमध्ये अमित शहांवर आरोप झाले होते. त्यांनी त्यावेळी राजीनामा का दिली नाही?
  • परमबीर सिंग यांनी या आधी का या विषयाला वाचा फोडली नाही?
  • एटीएसने सचिन वाझेंचा ताबा मागितल्यानंतर लगेचच एनआयएने सगळा तपास त्यांच्या हाती का घेतला?
loading image