खाडीत सापडलेल्या लहानग्यांच्या पालकांचा लागला शोध
ठाणे - ठाकुर्ली कचोरे परिसरातील खाडीत सोमवारी दोन लहान मुले आढळून आली होती. चोवीस तास उलटूनही या चिमुकल्यांच्या आईचा शोध लागलेला नाही. परंतू वडीलांचा शोध लागला असून मुलांची ओळख पटल्यानंतर मुलांना वडीलांच्या ताब्यात देण्यात येईल. सुब्रत साहू (वय 45) असे वडीलांचे नाव आहे. आईचा शोध अद्याप सुरु असल्याची माहिती विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय साबळे यांनी दिली.
सोमवारी दुपारी ठाकुर्ली गावदेवी मंदिर येथील खाडी परिसरातील एका खडकावर दोन लहान मुले स्थानिकांना आढळून आली होती. खाडीला भरती असल्याने या मुलांना पाण्याने पूर्णपणे वेढले होते. ही बाब या परिसरात फेरफटका मारण्यास आलेल्या स्थानिक रहिवासी गणेश मुकादम, अमित मुकादम व तेजस मुकादम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता खाडीत उडी घेत मुलांना पाण्यातून बाहेर काढले. या मुलांना येथे कोण सोडून गेले याचा तपास न लागल्याने स्थानिकांनी अखेर विष्णूनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेत परिसराची पहाणी करत मुलांच्या पालकांचा शोध घेतला परंतू त्यावेळी कोणीही परिसरात आढळून आले नाही. मुलांजवळ एक चप्पल व मोबाईल आढळून आला होता. त्याआधारे पोलिसांनी पालकांचा तपास सुरु केला.
सह कुटूंब हे ठाकुर्ली 90 फीट रोड परिसरात राहण्यास असून सुब्रत यांची कोरोनाकाळात नोकरी गेली होती. त्यामुळे ते दूधाच्या पिशव्या टाकण्याचा व्यवसाय करीत होते. या कामासाठी ते पहाटे 4 वाजताच डोंबिवलीहून कल्याण येथे जात होते. त्यांची पत्नी रत्नमाला साहू (वय35) ही देखील पार्लरचा व्यवसाय करीत होती. टिळकनगर परिसरातील एका पार्लरमध्ये ती लहानग्यांना घेऊन अनेकदा जात होती. लॉकडाऊन काळात दोघांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने त्यांच्यात वाद होत होते. यामुळे रत्नमाला ही तणावात होती. सोमवारी सकाळी सुब्रत हे नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडले. दुपारी ते घरी आले असता त्यांना घरात रत्नमाला व मुले आढळून आली नाहीत. परंतू कामावर गेली असेल असा अंदाज त्यांनी बांधला. सायंकाळीही पत्नी घरी न आल्याने त्यांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी करत शोधाशोध सुरु केली. सुब्रत यांचा फोनचीही यादरम्यान चार्जींग नव्हती. त्यांनी फोन चार्ज केल्यानंतर त्यांना फोनवर विष्णूनगर पोलिसांचा मिसकॉल दिसला. त्यांनी त्या नंबरवर संपर्क साधला असता त्यांना आपल्या मुलांविषयी माहिती मिळाली असल्याचे सुब्रत यांनी प्राथमिक तपासात सांगितल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक साबळे यांनी सांगितले.
घटनास्थळी आढळलेल्या मुलांचे नाव स्नेहांश साहू (दिड वर्ष) व अयांश साहू ( 3 महिने) असे असून सध्या ते डोंबिवलीतील जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेकडे सांभाळ करण्यास त्यांचा ताबा देण्यात आला आहे. दिड वर्षीय स्नेहांशची वडिलांशी ओळख तपासणी झाल्यानंतर त्यांना वडिलांच्या ताब्यात देण्यात येईल. तणावातून महिलेने आत्महत्या केली असावी असा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त होत असला तरी अद्याप ठोस सांगता येणार नाही असे साबळे म्हणाले.
The parents of the little ones found in the creek were searched
-----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.