क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीचा भाग कोसळला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मुंबई पोलिस आयुक्तालयासमोरील अहमद नावाच्या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.

मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरातील मुंबई पोलिस आयुक्तालयासमोरील अहमद नावाच्या चार मजली इमारतीचा काही भाग शुक्रवारी सकाळी 10.45 च्या सुमारास कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

टिळक रोडवरील लोहार चाळीजवळ ही म्हाडाची उपकरप्राप्त इमारत आहे. जुनी तसेच धोकादायक झाली असल्याने ती रिकामी करण्यात आली होती. इमारतीचा भाग कोसळला तेव्हा सहा जण वरच्या मजल्यावर अडकल्याचे शेजारच्या इमारतीतील रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी एका गोदामाच्या दरवाजातून दोरी टाकून तसेच शिड्या लावून त्या सहा जणांना बाहेर काढले. ढिगारा उचलण्याचे काम दिवसभर सुरू होते. 

दरम्यान, अंधेरी पूर्वेकडील न्यू एअरपोर्ट कॉलनीजवळील लालेवाडी येथे एका इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या मुरगन नायडू (45) व अरविंद नायडू (12) यांना कूपर रुग्णालयात उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Part of the building collapsed near Crawford Market