रिक्षाचालकांमुळे प्रवासी मेटाकुटीला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.

वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून तब्बल ११० तक्रारी करण्यात आल्या आहेत.

झपाट्याने वाढणाऱ्या नवी मुंबईत प्रामुख्याने १४ रेल्वेस्थानके, शेकडो बसथांबे, एपीएमसी, सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीतील मार्गावर रिक्षाव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र प्रवाशांच्या नशिबी या रिक्षाचालकांचा त्रास जणू काही पाचवीलाच पुजला असल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत सध्या सुमारे २२ हजार अधिकृत रिक्षा आहेत; मात्र अनधिकृत रिक्षादेखील नवी मुंबईत धावत आहे. यातील अनेक रिक्षा राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे सुरू असल्याने प्रवाशांना रिक्षाचालकांची मुजोरी सहन करावी लागते.

नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, नेरूळ, सानपाडा, दिघा, ऐरोली, रबाळे, घणसोली, बेलापूर या ठिकाणी १४१ अधिकृत रिक्षा स्टॅण्ड आहेत; परंतु प्रत्यक्षात मात्र २२५ रिक्षा स्टॅण्ड नवी मुंबईत आहेत. तरीही रिक्षा चालक-मालक संघटनांकडून आणखी ३० ते ४० रिक्षा स्टॅण्डची मागणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ रेल्वेस्थानकांबाहेर रिक्षा स्टॅण्ड हे जवळजवळच एकमेकांना लागून असल्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात रिक्षाच रिक्षा दिसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे जिकिरीचे होऊन गेले आहे. तर रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करून प्रवाशांची चढ-उतार करत असल्यामुळे व अचानक रस्त्यामध्ये रिक्षा थांबवण्याचे प्रकार करत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आरटीओकडे वर्षभरात ११० तक्रारी
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे  एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत ११० तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या असून ८५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे. यामध्ये जादा भाडेआकारणी करणे, भाडे नाकारणे अशा तक्रारी नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने परिवहनच्या संकेतस्थळ व ई-मेलवर करण्यात आल्या आहे.

१८ लाख ७५ हजारांचा दंड वसूल
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनच्या पथकांकडून एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत दोन हजार १६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात ७२१ वाहने दोषी आढळली. यामध्ये जादा प्रवासी- ५४४, भाडे नाकारणे- २२, उद्धट वर्तणूक- १४, जादा भाडे आकारणे- १२  अशा गुन्ह्यांमुळे रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून १८ लाख ७५ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहनचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आरटीओचे पथक गेले असता अनेकदा रिक्षाचालक रिक्षा घेऊन पळ काढतात; मात्र रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संयुक्त कारवाई करण्यात येईल.
- दशरथ वाघुले, उप्रप्रादेशिक परिवहन अधिकारी

वाशी सेक्‍टर- १७ ते तुर्भे या मार्गावर अन्य ठिकाणी रिक्षाचालक जाण्यास नकार देतात. रात्री हार्बर मार्गावरील रेल्वे बंद झाल्यानंतर रिक्षाचालकाशिवाय पर्याय नसतो. त्या वेळी रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात.
- रमेश सूर्यवंशी, प्रवासी

ऐरोली रेल्वेस्थानकापासून दिघा येथील अंतर्गत असणारे इलठणपाडा, विष्णूनगर, आनंदनगर या भागाकडे येण्यास अनेक रिक्षाचालक नकार देतात. रिक्षाचालक येण्यासाठी तयार झाले, तर मनमानी पैसे उकळतात. जादा भाड्याबाबत विचारणा केल्यास सर्व रिक्षाचालक मिळून अरेरावी करतात.
- संतोष हासुळे, प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger suffer due to rickshaw drivers