पोलादपुरातील संग्रहालयाच्‍या पूर्णत्‍वासाठी एकजूट

देवेंद्र दरेकर : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

शिवचरित्र भूमीत दुर्गसृष्टी उभारण्याची गिर्यारोहक प्रशांत भूतकर यांनी संकल्पना मांडली होती.

पोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे महत्त्वाचे पान पोलादपूरनगरीत आहे. काव्यमय चरित्र समकालीन लेखक कवी कवींद्र परमानंद नेवासकर यांनी शिवरायांनी आग्रा ते रायगड या २२ दिवसांच्या प्रवासाच्या केलेल्या वर्णनानुसार काव्यमय शिवचरित्र साकारले. या शिवचरित्र भूमीत दुर्गसृष्टी उभारण्याची गिर्यारोहक प्रशांत भूतकर यांनी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच त्याला स्थगिती दिली. गेल्या आठ वर्षांपासून हे संग्रहालय पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असल्याने आता ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकी केली आहे.

शिवभारत या ग्रंथातून पोलादपूरची आठवण व शिवरायांचा तेजोमय इतिहास असलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून १० वर्षांपूर्वी शिवदुर्गसृष्टी ही संकल्पना इतिहासप्रेमीच्या वतीने पोलादपूर येथे उदयास आली. पोलादपुरातील यंग ब्लड्‌स ॲडव्हेंचर्स या संस्थेच्या माध्यमातून विशेष कमिटी संस्थेच्या अधिपत्याखाली समिती गठीत करून संकल्पनाकार प्रशांत यांच्या पुढाकाराने दुर्गसृष्टीचे काम सुरू झाले. या संकल्पनेच्या स्वरूपासाठी पनवेल येथे भरवण्यात आलेले उद्धव ठाकरे यांच्या एरियल फोटोग्राफीचे प्रदर्शन पाहण्यासाठी शिलेदार गेले. त्या वेळी त्या प्रदर्शनाच्या आधारे ऐतिहासिक बारकाव्यासह रचनात्मक गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचे शिवसंग्रहालय उभे करण्याचे निश्‍चित करण्यात आले. आभाळातून घेतलेल्या फोटोमधील गडकोट प्रत्यक्षात प्रतिकृतीद्वारे साकारले, तर एका नजरेत इतिहासप्रेमींना गडाचा आकार, उकार, अभ्यासपूर्ण बारकावे, गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व व भौगोलिक स्थान अधोरेखित होईल. या प्रगल्भ विचाराने या कामाला सुरुवात झाली. 

किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून या महत्त्वाच्या गडकोटांच्या प्रतिकृतींची माळ शिवचरित्रकारांच्या भोवती विणूया या टॅगलाईन खाली हे दुर्गसृष्टीचे काम सुरू झाले. पोलादपूर, महाड, महाबळेश्वरसह अनेक इतिहासप्रेमी स्वतःहून हातभार लावण्यासाठी पोलादपूर येथे दाखल होऊ लागले. दुर्गसृष्टीचे काम पोलादपूरचे प्रशांत यांच्या अथक अभ्यासाने व पुढाकाराने आणि प्राध्यापक अजय धनावडे यांच्या माध्यमातून आकारास येऊ लागले. 

दुर्गसृष्टीतील १० किल्ले आकारास येऊन ते काम प्रगतिपथावर असताना दोन-तीन वर्षांमध्ये अनेक इतिहासकार व इतिहासप्रेमींनी या ठिकाणाला भेट दिली. यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, अमरावतीचे गजानन देशमुख, इंद्रजीत सावंत, आप्पा परब, अरविंद इनामदार, विश्वासराव पाटील, खडकबाण, आप्पा उतेकर यांसह इतिहास दुर्ग सहली करणाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या. या कालावधीमध्ये कमीत कमी १०० ते १२५ शाळांच्या सहली या दुर्गसृष्टीला भेट देण्यासाठी येथे आल्या. याशिवाय, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, किशोर धारिया आदी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी भेट देऊन प्रकल्पाचे कौतुक केले. त्यानंतर पूर्णत्वाकडे जाणारा हा प्रकल्प अचानक कुठेतरी माशी शिंकली, असा थांबला गेला. त्या वेळी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करून हा प्रकल्प स्थगित करण्यात आला. २०१२ पासून हा प्रकल्प पूर्ण स्थगित झाला. आजदेखील हे किल्ले बऱ्यापैकी तग धरून असल्याचे दिसते.

दुर्गसृष्टीचे काम स्थगित केल्यापासून आठ वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची विशेष प्रगती न करता या ठिकाणी दुर्लक्षितपणा सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील पहिले उभे राहणारे गड-किल्ल्यांचे पोलादपुरातील प्रतिकात्मक प्रतिकृतीचे संग्रहालय अर्धवट राहिले. यामुळे सर्व इतिहासप्रेमींना यापासून वंचित राहावे लागले आहे. या प्रकल्पाचे संकल्पनाकार प्रशांत यांचे २५ सप्टेंबरला आकस्मित निधन झाले आणि सर्व ऐतिहासिक गिर्यारोहक व सामाजिक क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आले.  त्या वेळेस महाड व पोलादपूर येथे झालेल्या शोकसभेमध्ये इतिहासप्रेमींसह सामाजिक संघटनेमध्ये हा दुर्गसृष्टी प्रकल्प सर्वांनी एकजुटीने उभारण्यासाठी एकी तयार केली आहे. तरी हा संकल्प तडीस नेण्यासाठी पोलादपूर, महाड, प्रतापगड, महाबळेश्वरसह रायगडमधील सर्व संघटना एकवटल्या आहेत. या प्रकल्प पूर्तीसाठी सर्व राजकीय लोकप्रतिनिधींनीही पाठबळ जाहीर केले आहे. हा दुर्गसृष्टी प्रकल्प पूर्ण करून सर्व ऐतिहासिक सामाजिक व गिर्यारोहण संघटना प्रशांत भूतकर यांना प्रकल्प पूर्ण करून खरी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. या दुर्गसृष्टीच्या पूर्ततेने शिवरायांच्या इतिहासाचे सोनेरी पान शिवचरित्र भूमी पोलादपूरमध्ये उमटले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People has came together for Museum of Fort