मास्क वापरणे आता सवय झाली पाहिजे! मुंबईकर म्हणतात...

बेजबाबदार वागून सध्या तरी चालणार नाही
mask use
mask usesakal

मुंबई : मुंबई पालिकेसह (BMC) खासगी रुग्णालयांतील कोविड रुग्णसंख्या (corona patients) कमी झाल्याने सरकारने निर्बंधांत थोडी शिथिलता आणल्याने रस्त्यांसह मैदाने, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी (Public place) पुन्हा एकदा गर्दी होत आहे. सध्या लग्नसराईही सुरू झाल्याने बाजार आणि दुकांनामध्ये खरेदीची लगबग दिसत आहे. मात्र, अनेक जण मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. मास्कचा वापर (Mask use) अनिवार्य असताना अनेकांना त्याचा विसर पडलेला दिसतो. मास्क मुक्त मुंबई करण्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली असली तरी अनेक जण कोविडबाबत आजही गंभीर आहेत.

mask use
मुंबईत ६० कोटींचे ड्रग्स जप्त, कॅन्सर उपचारासाठी आलेल्या महिलेला अटक

मुंबईकरांची मते जाणून घेतली असता मास्कबाबत त्यांच्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, मास्क वापरणे आता सवय झाली पाहिजे, असे ठाम मत अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांनीही मास्कचे सुरक्षा कवच सध्या तरी हवेच, असे स्पष्ट केले आहे.
२२ महिन्यांपेक्षा अधिक काळ नागरिक मास्क वापरत आहेत. आता कुठे कोरोना थोडा नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. साहजिकच अनेक जण मास्क वापरण्याबाबत कंटाळा किंवा बेजबाबदारपणा करत आहेत. मात्र, अनेकांनी कोविडची भीती कमी झाली असली तरीही मास्क वापरायलाच हवा, असे स्पष्ट केले.

कोविड अजून गेलेला नाही

दादरच्या फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या स्नेहा हातिम सध्याच्या कोविड परिस्थितीविषयी म्हणाल्या, की रुग्णसंख्या कमी झाली असली तरी संसर्ग कोणालाही कसाही होऊ शकतो. कोरोनाची आताची परिस्थिती म्हणजे पालिका निवडणुकीचा अजेंडा आहे. निवडणुका संपल्या की पुन्हा कोरोना वाढलेला दिसेल. आम्ही आजही कामाच्या ठिकाणी मास्क वापरतो. कारण घरी ज्येष्ठ नागरिक असल्याने आपल्यापासून त्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. कोविड अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे किमान दुसऱ्याला आपल्यामुळे कोविड होऊ नये म्हणून मास्क वापरायला हवा.

काही गोष्टी पाळायलाच हव्या

सध्या जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावरही मोठी गर्दी उसळत आहे. स्थानिक रहिवासी सचिन हसम म्हणाले, की कोविडची भीती आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. कार्यालयात आजही मास्कची सक्ती आहे. रुग्णसंख्या पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत मास्क वापरायलाच हवा. इतर कोविड निर्बंधही पाळले पाहिजेत. मास्क घालण्याचा कंटाळा करून चालणार नाही. जर सर्व पूर्ववत व्हायचे असेल तर काही गोष्टी आपणही पाळल्या पाहिजेत.

कोविड संसर्ग भीतीचा!

परळमध्ये सामान पोहोचवण्याचे काम करणारे तानाजी भिमाजी लोहोट यांनी कोविडचा संसर्ग जास्त करून भीतीचा असल्याचे सांगितले. मास्क वापरण्याची सक्ती आता कमी केली पाहिजे. कारण, सक्ती आहे म्हणूनही बरेच जण मास्क वापरतात, असे मत त्यांनी मांडले. तानाजी लोहोट यांनी दुसऱ्या कोविड लाटेत आपल्या पत्नीला गमावले. कोणतीही लक्षणे दिसत नसताना ताप आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करून जवळपास पावणेदोन लाख रुपये खर्चूनही पत्नीला वाचवण्यात डॉक्टरांना यश न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोहोट यांनी सांगितले, की पत्नीने कोविडची धास्ती घेतली होती.

ताप आल्यानंतर तिला एका खोलीत ठेवले होते. ती कोणाला जवळही येऊ द्यायची नाही. तिसऱ्या दिवसापासून तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. मी आजारी झाले तर मला डॉक्टरकडे कोण घेऊन जाणार, असे म्हणायची. १०४ ताप आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेलो. काहीच झाले नसताना तिला व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता भासली. तिच्या ऑक्सिजनच्या पातळीत बरीच घट झाली होती. उपचारानंतरही ती वाचली नाही. कोविड भीतीचा आजार आहे. जो घाबरला त्यांना बऱ्याचशा समस्या जाणवल्या, असे लोहोट यांनी सांगितले.

मास्ककडे दुर्लक्ष नको

कुणाल तांबडे परळचे रहिवासी. ते म्हणाले, की कोविडची भीती नागरिकांमध्ये अजूनही आहे. पण ते आता आपापल्या पद्धतीने काळजी घेत आहेत. मी स्वत: आरोग्य क्षेत्रात काम करतो. माझ्या दुर्लक्षाचे परिणाम घरातल्यांना भोगावे लागतील. माझी बहीण आणि पत्नी दोघेही कोविड वॉर्डमध्ये काम करतात. त्यामुळे आम्ही घरीही मास्क वापरतो आणि बाहेरही. प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चर्मकार रमेश वाघमारेदेखील मास्क वापरण्यावर भर देतात. जेव्हा एखादा ग्राहक त्यांच्या दुकानावर चप्पल शिवण्यासाठी येतो तेव्हा ते स्वत: आणि त्यालाही मास्क घालण्याबाबत सूचना देतात. आम्ही स्वत:ही २४ मास्क वापरतो. कोविड कमी झाला आहे; पण मास्क लावला पाहिजे, असे ते सांगतात.

मास्कचा कंटाळा नको

नायगाव पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असणारे गोरख रणनवरे यांनी सांगितले की, आम्ही दिवसातून मास्क नसलेल्या किमान चार ते पाच नागरिकांवर कारवाई करतो. आमची कारवाई अजूनही जोरात सुरू आहे; पण काही नागरिकही बेजबाबदारपणे वागतात. मास्कचा कंटाळा आला असला तरी तो वापरणे गरजेचे आहे.

तज्ज्ञ म्हणतात, गर्दीत मास्क हवाच!

मुंबई सध्या निर्बंधमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. कमी झालेली रुग्णसंख्या, घटलेला मृत्युदर आणि बाधितांचे कमी प्रमाण असे दिलासादायक चित्र असले तरी मुंबईसारख्या शहरात कोविड नियम पाळणे आव्हान आहे. सुरक्षित अंतर पाळणे कठीण आहे. सर्व निर्बंध शिथिल झाले तरी मास्क वापरण्याचा नियम असलाच पाहिजे. मास्क आधी आजारी व्यक्तीच वापरायची; आता तसे नाही. दोघांनाही सुरक्षा हवी असेल तर मास्क वापरला पाहिजे, असे स्पष्ट मत टास्क फोर्स सदस्य आणि मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.


डॉ. सुपे यांच्या म्हणण्यानुसार, परदेशात मास्क काढा, अशी मोहीम सुरू आहे. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आदी देशांनी १ फेब्रुवारीपासून मास्क बंद करा, असे सांगितले होते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार अजूनही मास्क लावायची गरज आहे. काही देशांनी म्हणजे चीन, भूतान आणि इस्राईलमध्ये मास्क वापरणे बंद केले होते, जून २०२१ मध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली तेव्हा तो निर्णय पुन्हा बदलला. तिसरी लाट पहिल्या आणि दुसरीच्या तुलनेत घातक नाही म्हणून मास्क नाही वापरला तरी चालेल, हा त्यांचा निर्णय झाला. पण आपल्याकडे गर्दीत सुरक्षित अंतर पाळणे कठीण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण अजूनही ज्येष्ठ नागरिकांना कोरोना आजार देऊ शकतो. त्यातून त्यांचे मृत्यूही होत आहेत. मुंबईचे निर्बंध जरी शिथील झाले तरी जिथे हवा खेळती आहे.

तिथे मास्क नाही वापरला तरी चालेल. गाडीत एकटे आहात तर तिथेही मास्क वापरू नका. कमी नागरिक असतील तर तिथेही मास्क नाही वापरला तरी चालेल. मात्र, गर्दीच्या ठिकाणी असाल तर मास्क वापरलाच पाहिजे. ज्या ज्या देशांमध्ये मास्क काढायचा निर्णय घेतला गेला आहे तिथे एक ते दोन मीटर अंतर ठेवावे, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. पण मुंबईसारख्या शहरात असे करणे कठीण आहे. म्हणूनच आणखी काही महिने मास्क घालावा, असे आवाहनही डॉ. सुपे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com