कृषी कायद्याविरोधातील जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच: बाळासाहेब थोरात 

कृषी कायद्याविरोधातील जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच: बाळासाहेब थोरात 


मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कॉंग्रेसने राज्यभरात "किसान मजदूर बचाओ दिन' पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. कृषी कायद्याविरोधातील कॉंग्रेसचे जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच असल्याचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 

राज्याच्या सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव, नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार हिरामण खोसकर, नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, प्रदेश सरचिटणीस माजी डॉ. उल्हास पाटील, माजी आ. अनिल अहेर, शिरीष कोतवाल, गुणवंत होळकर आदी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

यावेळी थोरात म्हणाले की, शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करावे या मागणीसाठी कॉंग्रेस पक्ष दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. महाराष्ट्रातील या मोहिमेचा शुभारंभ लासलगाव येथे करण्यात आला. राज्यातील प्रत्येक तालुक्‍यात कॉंग्रेस कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज बुलंद करत आहेत. राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे. मोठ्या संघर्षातून आणि प्रयत्नांतून बाजार समिती आणि हमीभाव ही व्यवस्था उभी राहिली. जुलमी कृषी कायद्यामुळे भाजप सरकार ही शेतकरी हिताची व्यवस्था मोडीत काढत आहे. कंत्राटी शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भूमिहीन करून उद्योगपतींचा फायदा करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे, असे थोरात म्हणाले. कॉंग्रेसच्या आजच्या राज्यव्यापी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात व्हर्च्युअल किसान मेळावा घेण्यात येणार आहे. 

नांदेडमध्ये बैलगाडी लॉंग मार्च 
नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लॉंग मार्च काढण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, "हम करोसे कायदा, आम्हाला वाटेल ते नियम करू' अशा हुकूमशाही प्रवृत्तीतून केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत हे कायदे मंजूर केले. अशा कायद्याच्या माध्यमातून देशाची लूट करायचे काम सहा वर्षांपासून सुरू आहे. ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीने देशाला लुटले तशाच पद्धतीने आता भाजपच्या रुपाने व्यापारी देशाला लुटत आहेत. 

राज्यभरात आंदोलने 
मुंबईतील आंदोलनात मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी हिंगोली मध्ये, तर अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार नंदूरबार येथे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले. गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर येथे तर कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली मार्केट यार्ड येथे आंदोलन करण्यात आले. 
----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com