यंदा आयटीआय प्रवेशाचा टक्का घसरला; तिसऱ्या फेरीनंतर 53 हजार 886 जागांवर प्रवेश

यंदा आयटीआय प्रवेशाचा टक्का घसरला; तिसऱ्या फेरीनंतर 53 हजार 886 जागांवर प्रवेश

मुंबई  : राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरही खूप कमी विद्याथीं प्रवेश निश्‍चित करत आहेत. यामुळे तीन फेऱ्यांनंतर 53 हजार 886 जागांवर प्रवेश झाले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा 15 ते 20 टक्के प्रवेश कमी झाले असून पुढील दोन फेऱ्यांमध्ये अधिकाधिक विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेश घेतील, अशा विश्‍वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

राज्यातील आयटीआयची प्रवेशप्रक्रिया व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत आहे. यंदा कोरोना आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. मराठा आरक्षणाचा पेच सुटल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यातील 358 तालुक्‍यात 417 शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची प्रवेश क्षमता 92 हजार 556 इतकी आहे. याचबरोबर राज्यात 569 खाजगी आयटीआय असून त्यांची प्रवेश क्षमता 53 हजार 272 आहे. शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये 1 लाख 45 हजार 828 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये एकूण 53 हजार 886 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत.

पहिल्या फेरीमध्ये 88 हजार 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यापैकी केवळ 30 टक्के म्हणजे 26 हजार 881 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीमध्ये 72 हजार 733 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. परंतू यापैकी 13 हजार 673 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 18.80 टक्के होते. तसेच तिऱ्या फेरीमध्ये 63 हजार 820 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यापैकी 13 हजार 332 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या फेरीतही केवळ 20 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. गतवर्षी सर्व फेऱ्यांअंती 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. या तुलनेत यंदा प्रवेशाचे प्रमाण 15 ते 20 टक्के घसरले असल्याचे, आयटीआयमधील सुत्रांनी सांगितले. प्रवेशाच्या आणखी दोन महत्वाच्या फेऱ्या शिल्लक असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील, असा विश्‍वास अधिकाऱ्यांना आहे.

शुल्काअभावी प्रवेशाकडे पाठ ?
आयटीआयच्या राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संस्थांकडून संपर्क साधल्यास कापूस वेचणी, तेंदूपता याची कामे करण्यात व्यस्त असल्याचे, विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्यासही पैसे नाहीत. त्यामुळेही प्रवेश कमी झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

The percentage of ITI admissions has dropped this year Admission to 53 thousand 886 seats after the third round 

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com