esakal | भिवंडीत उड्डाणपुलावरील रस्त्याची चाळण
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपुलावरील रस्त्याची खड्डामुळे झालेली चाळण

भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथे दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या वतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर मुसळधार पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होत असल्याने वाहनांची मोठी रांग लागते.

भिवंडीत उड्डाणपुलावरील रस्त्याची चाळण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथे दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या वतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर मुसळधार पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होत असल्याने वाहनांची मोठी रांग लागते. रात्रीच्या वेळी अवजड वाहने खड्ड्यांमध्ये आदळून बंद पडत आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. 

उड्डाणपुलाची निगा व दुरुस्तीचे काम जेएनसी या कंपनी ठेकेदाराकडे आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून ठेकेदाराने उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने पुलावरील रस्त्याचे पुष्ठभाग खराब होऊन स्लॅब खुला झाला आहे. रस्त्यावरील काँक्रीट खराब झाल्याने मोठे खड्डे पडले असून, वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर भिवंडी- वाडा- नाशिककडे जाणारी लहान-मोठी वाहने; तसेच ट्रक व कंटेनरची कोंडी होते. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. दररोज होणाऱ्या कोंडीमुळे नोकरदारवर्ग, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या दुरवस्था झालेल्या रस्त्याबाबत राजकीय पक्षाचे पुढारी मूक भूमिका घेत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.

एमएमआरडीएला पत्र
महापालिका आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी या प्रकरणी दखल घेऊन शहर अभियंता यांना दुरुस्तीबाबत सूचना केल्या आहेत. एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी तातडीने ठेकेदारामार्फत हा उड्डाणपूल दुरुस्त करून द्यावा, असे पत्र पालिकेच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता एल. पी. गायकवाड यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

loading image