esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला उद्धव ठाकरेंना फोन
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray-PM-Modi

राज्यातील राजकारण तणावपूर्ण असताना पंतप्रधानांच्या फोनमुळे भुवया उंचावल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला उद्धव ठाकरेंना फोन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: सध्या राज्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार विरूद्ध भाजप असा संघर्ष सध्या राज्यात सुरू आहे. त्याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आदित्य यांची प्रकृती ठणठणीत आहे. मात्र रश्मी ठाकरे यांची मात्र प्रकृती काल अचानक बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांना HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २३ मार्चला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज त्यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रश्मी ठाकरे यांना नेमकं कशासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ते सुरूवातीला स्पष्ट झालं नाही. पण त्यांचा खोकला वाढल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पोस्ट कोविड तपासणीसाठी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची शक्यता आहे, अशीही चर्चा आहे. कोरोना होऊन गेल्यानंतरही शरीरावर त्याचे काही परिणाम होतात. त्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना दाखल करण्यात आले असू शकते.

मुंबई विभागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा

११ मार्च रोजी मुंबईच्या जे जे रूग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर १२ दिवसांच्या आतच रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्या वर्षा निवासस्थानीच होम क्वारंटाईन होत्या.

loading image