शासकीय आदेशाला केराची टोपली; माळशेजमध्ये पर्यटकांना आवरताना पोलिसांची दमछाक

Malshej Ghat
Malshej Ghat

सरळगाव : पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी माळशेज घाटात गर्दी केली होती. जीवित हानी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रतिबंधक आदेश जारी करून पर्यटकांसाठी 31 जुलैपर्यंत पर्यटकांना घाटात जाण्यासाठी बंदी केली आहे. मात्र, काल (रविवार) साप्ताहिक सुटी असल्याने या प्रतिबंधक आदेशाला धाब्यावर बसवत हजारो पर्यटकांनी धबधब्यात भिजण्याचा यथेच्छ आनंद लुटला. 

पर्यटकांवर या बंदीचा कोणताही परिणाम असल्याचे दिसून आले नाही. पोलिसांची कुमक कमी असल्याने प्रतिबंधक आदेश भंग करणाऱ्या पर्यटकांना हटविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. टोकावडे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे स्वत: आपला फौजफाटा बरोबर घेऊन पर्यटकांना धबधब्यापासून हटविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांची संख्या कमी असल्यान आणि जुन्नरमार्गे घाटात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त होती. तसेच या मार्गावर एकही चेकनाका नसल्याने या भागातून येणाऱ्या पर्यटकांना धोपवताना पोलीस खात्याची दमछाक होत असल्याचे चित्र दिसून येत होते. 

निसर्गरम्य ठिकाण असलेल्या माळशेज घाटात धुके, ऊन आणि पावसाचा लपंडाव पाहण्यासाठी दरवर्षी जून-जुलै महिन्यात हजारो पर्यटक माळशेजला भेट देतात. हजारो पर्यटक मौज-मजा करण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी येत असतात. यासोबतच काही हौसे पर्यटकही या ठिकाणी येत असतात. बरेच पर्यटक या ठिकाणी आल्यावर मद्यपान करतात. तसेच मद्याच्या धुंदीत धोकादायक ठिकाणी असलेल्या कठड्यावर उभे राहून फोटो व सेल्फी काढत असतात. या सेल्फी काढण्याच्या नादात या अगोदर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भरीस भर म्हणून या परिसरात पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढल्याने हा घाट पर्यटकांसाठी धोक्याचा ठरत आहे. 

धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह
माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांमध्ये तरूण पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यात अनेक तरूण मद्दप्राशन करून रस्त्यावरून जाताना गलिच्छ शब्दांचा वापर करत आहेत. तसेच मोठ्या आवाजात शेरो-शायरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. हे तरुण नशेमध्ये असताना धोकादायक ठिकाणावर बांधलेल्या कठड्यावर उभे राहून फोटो, सेल्फी काढताना दिसून येत होते. या गोष्टीला मज्जाव करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालतानाचे चित्रही पाहावयास मिळाले. त्यामुळे अशा पर्यटकांवर बंदी घालणे जरूरीचे आहे.
- सीमा राऊत, पर्यटक, मुंबई.

घाटबंदीवर प्रर्यटकांची नाराजी
पर्यटन क्षेत्र वाढले पाहिजे, तसेच पर्यटन क्षेत्र परिसरातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी शासन लाखो रूपये पर्यटनावर खर्च करीत आहे. माळशेज घाटात पर्यटकांची संख्या वाढावी व या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना कोसळणाऱ्या दरडींपासून संरक्षण मिळावे, यासाठी लाखो रूपये खर्च करून संरक्षण जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. असे असताना घाटातील सरसकट धबधब्यांवर बंदी घालणे म्हणजे पर्यटकांची हौस-मौज हिरावून घेणे होय. शासनाने घाटातील धोक्याच्या ठिकाणी बंदी घालावी, मात्र सरसकट धबधब्यांवर बंदी घालू नये.
- सदानंद पोपटराव, पर्यटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com