भाजपचे नवमतदारांसाठी "युवा वॉरिअर'; ओबीसी हक्क परिषदा घेणार

मिलिंद तांबे
Wednesday, 10 February 2021

राज्यातील 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याविषयी प्रचंड आकर्षण असून, अशा नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे "युवा वॉरिअर' असे नवे संघटन भाजपतर्फे उभे करण्यात येणार आहे.

मुंबई  : राज्यातील 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याविषयी प्रचंड आकर्षण असून, अशा नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे "युवा वॉरिअर' असे नवे संघटन भाजपतर्फे उभे करण्यात येणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये भविष्यात ओबीसी हक्क परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते तथा आमदार ऍड. आशीष शेलार यांनी दिली. 

महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये 8 आणि 9 तारखेला झालेल्या दोन दिवसीय योजना बैठकीबाबत आज शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि केंद्रातील 40 हून अधिक नेते, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

मुंबई, ठाणे, रायगड. पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पक्षाची वाटचाल, विस्तार, विविध आघाड्यांच्या माध्यमातून पक्षाची वाढ, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळावे म्हणून रणनीती निश्‍चित करणे, राज्यातील तीन सत्ताधारी पक्षाविरोधात एक भाजप असा सामना झाला तरी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश कसे मिळेल. शतप्रतिशत भाजपच्या यशाची सविस्तर चर्चा, नियोजन व योजना या बैठकीत निश्‍चीत केल्याचे शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून जनतेवर होत असलेला अन्याय व त्यासाठी जनतेच्या प्रश्‍नांसाठी भाजपने करावयची आंदोलने याबाबतही नियोजन या बैठकीत करण्यात आले. दरम्यान, "सामना'च्या अग्रलेखाचाही शेलार यांनी समाचार घेतला. 

ओबीसी हक्क परिषदा घेणार! 
राज्यातील ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात नीट न मांडल्याने मराठा आरक्षणाला नख लागले. आता ओबीसी समाजाला आणि ओबीसी घटकाला घटनेने मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री भूमिका घेत आहेत. त्यामुळे अशा ओबीसी घटकाला संविधानाने दिलेल्या आरक्षणासाठी राज्यातील 36 जिल्ह्यामंध्ये भाजपतर्फे येणाऱ्या काळात ओबीसी हक्क परिषदा घेण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याचे आमदार आशीष शेलार यांनी सांगितले. 

कॉंग्रेसला वरचा नंबर नक्की मिळेल! 
कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात कॉंग्रेसच एक नंबर होईल, असे विधान केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, शेलार म्हणाले, आता कॉंग्रेस किती नंबरी आहे हे जनतेने पाहिले आहे. अशा नंबरी कॉंग्रेसला अजून नंबरी करण्याचे काम नवे अध्यक्ष करणार असतील तर वर्षानुवर्षे कॉंग्रेसने चालवलेला धोकाधडी, भ्रष्टाचार, लबाडीच्या कार्यक्रमातील वरचा नंबर त्यांना नक्की मिळेल, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.

--------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

political marathi news OBC rights conference for new voters BJP politics news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi news OBC rights conference for new voters BJP politics news