हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तृप्ती देसाईंवर गुन्हा नोंदवा; भाजप मुंबई महिला मोर्चाची मागणी

कृष्ण जोशी
Sunday, 21 February 2021

तृप्ती देसाई यांनी हिंदू भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे

मुंबई  : माहूरच्या देवीला पुरुष पुजाऱ्यांनी अंघोळ घालणे, वस्त्रे नेसवणे, पूजा, साजश्रृंगार करणे हा सर्वच महिलांचा अपमान असून त्यामुळे देवीच्या पुजाऱ्यांमध्ये निम्म्या महिला नेमाव्यात असे म्हणणाऱ्या तृप्ती देसाई यांनी हिंदू भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे. 

पुरुष पुजाऱ्यांनी देवीला अंघोळ घालू नये, वस्त्रे नेसवू नयेत ही मागणी वाईट मानसिकतेतून तसेच हिंदू धर्माची बदनामी करण्याच्या भावनेतून करण्यात आली आहे. हिंदू देवळांमध्ये गेली हजारो वर्षे ज्या प्रथा सुरु आहेत, त्या चुकीच्या असल्याचा दावा करून त्या बदलाव्यात अशी धर्मविरोधी मागणी करण्याचा तृप्ती देसाई यांना काहीच अधिकार नाही. मुळात देवीला अंघोळ घालताना, वस्त्रे नेसवताना पडदे लावून भक्तांच्या नजरेस पडणार नाही, अशाच प्रकारे हे सोहळे केले जातात. त्यामुळे याबाबत कोणीही आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही, असेही श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी म्हटले आहे. 

 

गेली हजारो वर्षे चालत आलेल्या व कोणीही आक्षेप न घेतलेल्या प्रथांसंदर्भात असे विचित्र विचार आणि मागण्या करून तृप्ती देसाई यांनी सर्व देवीदेवतांचा तसेच पुजाऱ्यांचाही अपमान केला आहे. यापूर्वीही त्यांनी स्त्रीयांचे हक्क या नावाखाली अशाच प्रकारे देवळांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून हिंदू धार्मिक प्रथांमध्ये अवैध पद्धतीने ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही शीतल गंभीर देसाई यांनी दाखवून दिले आहे. 

अशा मागण्या करताना तृप्ती देसाई आपण मोठ्या समाजसुधारक असल्याचा आव आणीत आहेत. मात्र आता अशी मागणी केल्याने त्यांचा हिंदूविरोधी अजेंडा उघड झाला आहे. अशा महाभागांपासून देशातील सर्व महिलांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. कारण देवी आणि पुजाऱ्यांना विकृत नजरेने पहाणारे हे महाभाग उद्या सर्वसामान्य स्त्री पुरुषांनाही वाईट नजरेने पाहण्यास कमी करणार नाहीत, असाही दावा शीतल गंभीर देसाई यांनी केला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही देवळात महिला पुजारी नेमण्यास कोणाचीही हरकत नाही. पण मुळात निर्गुण, निराकार असलेल्या आदिशक्तीला पुरुष पुजाऱ्यांनी अंघोळ घालणे, वस्त्र नेसवणे हा सर्व स्त्रीयांचा अपमान आहे, असे जर कोणी म्हणत असेल तर उद्या पुरुष डॉक्टरांनी महिला रुग्णांना तपासू नये, असे तालिबानी फतवे देखील अशी मंडळी नक्कीच काढतील. इतकेच नव्हे तर जलतरण, जिमनॅस्टिक आदी खेळांमध्ये महिला खेळाडूंना पुरुष प्रशिक्षकाने प्रशिक्षण देऊ नये, शाळेत महिला विद्यार्थ्यांना पुरुषांनी शिकवू नये, स्त्रीयांना पुरुष बॉस नको, असे वाटेत ते हिटलरशाही फतवे हे महाभाग हमखास काढणार. हिंदू धर्मीय भाविक सहिष्णु असल्याने या महाभागांची अशा विकृत मागण्या करण्याची हिंमत होते, तरी यासंबंधात त्वरेने कारवाई करावी, अशीही मागणी शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे.

-----------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )
political marathi Report crime against Trupti Desai for hurting religious sentiments politics mumbai updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi Report crime against Trupti Desai for hurting religious sentiments politics mumbai updates