मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले! रस्त्यावरील वाहने वाढल्याचा परिणाम; हवेचा दर्जाही खालावला

भाग्यश्री भुवड
Monday, 12 October 2020

लॉकडाऊननंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत असून, अनेक रस्त्यांवर गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबई : लॉकडाऊननंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत असून, अनेक रस्त्यांवर गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. याशिवाय सहा महिन्यांपासून बंद असलेले कारखाने, मोठ्या कंपन्यांचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने (सफर) दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत शहरातील वायुप्रदूषण पातळी मध्यम असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक 85 यूएस एक्‍यूआय नोंदवला गेला आहे; तर वातावरणातील मुख्य प्रदूषक पीएम 10 इतका नोंदवला गेला आहे. 

Powercut: रायगडमध्ये बत्ती गुल; निम्म्या जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित

सहा महिने ठप्प असलेली वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने ही पातळी वाढल्याचे प्रदूषण नियंत्रण विभागाचे म्हणणे आहे. लॉकडाऊन काळात महामुंबईतील प्रदूषण कमालीचे कमी झाले होते; मात्र आठवडाभरापासून मुंबईत प्रदूषणाचे धुरकेदेखील दिसू लागले असून शहरातील अनेक भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा अनुभव येत आहे. शनिवारपासून शहरात धुराचे पातळ थर वाढले असून, प्रदूषणाच्या पातळीत वाढ दिसून येत आहे. सफर या संस्थेने नोंदवलेल्या गुणवत्तेनुसार शहरातील हवेचा एक्‍यूआय मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 50 च्या खाली होता; मात्र शुक्रवारी मुंबईत नोंदवण्यात आलेल्या एअर क्वालिटी इंडेक्‍स (एक्‍यूआय) 21 मार्चच्या लॉकडाऊननंतर आणि जुलैपासून टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या वाहतुकीनंतर 118 मध्यम स्वरूपाच्या एक्‍यूआयसह सर्वाधिक वाईट नोंदवण्यात आला आहे. 

 

बीकेसीतील हवा उत्तम 
सफरने नोंदवलेल्या निरीक्षणांतून यापूर्वी बदललेल्या हवामानानुसार वांद्रे कुर्ला कॉम्लेक्‍समधील (बीकेसी) हवेची गुणवत्ता सातत्याने घसरली होती; मात्र आता बीकेसीतील हवा हळूहळू सुधारत असून, सफर संस्थेने या परिसरातील हवा उत्तम दर्जाची नोंदवली आहे. मुंबई शहरापाठोपाठ भांडुप, कुलाबा, माझगाव, वरळी, बोरिवली, चेंबूर या ठिकाणची हवा उत्तम आणि समाधानकारक नोंदवण्यात आली आहे; तर मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई या परिसरातील हवा मध्यम स्वरूपाची नोंद करण्यात आली आहे. 

थकबाकीदारांना कर भरण्याची संधी, कल्याण-डोंबिवली पालिका राबवणार अभय योजना

अंधेरीत मध्यम हवा 
मालाड, अंधेरी, नवी मुंबई या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू होण्याआधी मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला होता. याशिवाय हवेतील प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते; मात्र लॉकडाऊन दरम्यान हवेच्या दर्जावर पुन्हा परिणाम झाला असून अंधेरी आणि नवी मुंबईत प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. 

परिसरनिहाय आकडेवारी 
एक्‍यूआय मुख्य प्रदूषक पीएम 
मुंबई (संपूर्ण शहर) 85 10 
बोरिवली (समाधानकारक) 93 2.5 
मालाड (मध्यम) 118 2.5 
बीकेसी (उत्तम) 10 03 
अंधेरी (मध्यम) 128 10 
कुलाबा (समाधानकारक) 80 10 
माझगाव (समाधानकारक) 83 2.5 
वरळी (समाधानकारक) 61 03 
भांडुप (समाधानकारक) 82 10 
चेंबूर (उत्तम) 50 03 
नवी मुंबई (मध्यम) 104 2.5

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution in Mumbai has increased The effect of increased vehicle traffic on the road