माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार  मूर्तिकार आणि कारागिरांना केंद्राचा दिलासा 

मिलिंद तांबे
Tuesday, 12 January 2021

पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत. प

मुंबई  : प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) वापर आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. त्या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी, असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत. परिणामी माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी राहणार नसल्याने मूर्तिकारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

महाराष्ट्रातील सुमारे पाच लाख मूर्तिकार आणि कारागिरांचे गाऱ्हाणे आज पुन्हा भाजप नेते आमदार ऍड. आशीष शेलार यांनी जावडेकर यांच्याकडे मांडले. महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे त्याबाबत तोडगा काढण्याची विनंती शेलार यांनी जावडेकर यांना केली. पीओपीवरील बंदीमुळे हजारो गणेश आणि दुर्गा मूर्तिकार अडचणीत आले आहेत. या व्यवसायात पाच लाखांहून अधिक कारागीर, मूर्तिकार व कारखानदारांचा रोजगार अवलंबून आहे. कोरोनामुळे या वर्षी हा उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याबाबत तोडगा निघावा, अशी विनंती करीत नुकतीच मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने शेलार यांच्या नेतृत्वाखाली जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने दिल्ली आयआयटीच्या रासायनिक अभियंता विभागाचे प्रमुख प्रा. के. के. पंत, प्रो. सी. बालोममुमदार यांच्यासह पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या डॉ. शुभांगी उंबरकर, डॉ. मोहन डोंगरे यांच्यासह वॉटर क्वॉलिटी मॅनेजमेंट विभागाचे सेक्रेटरी जे. चंद्राबाबू यांची समिती नेमली. त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत बंदीला स्थगिती देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत, अशी माहिती शेलार यांनी दिली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भाद्रपद गणेशोत्सव काळात कोरोनामुळे मूर्तिकार अडचणीत आले होते. पीओपीवरील बंदी मोठी अडचण होती. ती दूर झाल्याने मूर्तिकार आणि कारागिरांना दिलासा मिळाला आहे, असे मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नाना तोंडवलकर म्हणाले. "आमचे गाऱ्हाणे आम्ही दिल्लीपर्यंत मांडले. केंद्रीय मंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती देऊन आम्हाला मोठा दिलासा दिला आहे. सर्वांचे मनापासून आभार मानतो,' अशी प्रतिक्रिया अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी दिली. 

 

वर्षभर आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. भाद्रपद गणेशोत्सवासारखी आताही पीओपी वापराला सवलत मिळाल्याने विघ्न टळले आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. 
- ऍड. नरेश दहिबावकर,
अध्यक्ष, मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती 

 

अडचणीत असलेले मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना दिलासा देण्याचे काम आमदार ऍड. आशीष शेलार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. त्याबद्दल दोघांचेही आभार. पीओपीवर पर्यावरणपूरक तोडगाही लवकरच निघेल अशी आशा आहे. 
- जयेंद्र साळगावकर,
अध्यक्ष, महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघ

POP can be used in Maghi Ganeshotsav a relief to sculptors and artisans 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: POP can be used in Maghi Ganeshotsav a relief to sculptors and artisans