खंडीत विद्युत पुरवठ्याचा रुग्णालयावर परिणाम नाही; मुंबई महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

मिलिंद तांबे
Monday, 12 October 2020

प्रमुख्याने सर्वच रुग्णालयांमध्ये डिझेल इंधनावर चालणारी स्वयंचलित जनित्रे सुसज्ज असतात अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मुंबई : विद्युत वितरण व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्युतपुरवठा आज सकाळपासून खंडित झाला असून वीज पुरवठा आता टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरु होत आहे. महापालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा खंडित होण्याची वारंवारिता अत्यंत कमी असली, तरी महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये नेहमीच पर्यायी व्यवस्था उपलब्ध असते. याअंतर्गत प्रमुख्याने सर्वच रुग्णालयांमध्ये डिझेल इंधनावर चालणारी स्वयंचलित जनित्रे सुसज्ज असतात अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

हॉटस्पॉट कांदिवलीला किंचीत दिलासा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 पार

आजदेखील महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये विद्युुत पुरवठा खंडित झाल्यानंतर लगेचच सर्व जनित्रे स्वयंचलित पद्धतीने तात्काळ सुरू झाली. तसेच या अनुषंगाने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांमधील यंत्रणा तात्काळ कार्यरत झाली. तसेच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याने संभाव्य गरज लक्षात घेऊन सर्व विभागांमध्ये डिझेलचा पुरेसा साठाही तात्काळ करवून घेतला. या सर्व उपाययोजनांमुळे महापालिकेच्या सर्व रूग्णालयातील कामकाज अव्याहतपणे आणि सुरळीतपणे सुरू आहे.

जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू: सामना

महापालिकेच्या रुग्णालयांसह सर्व खाजगी कोविड रुग्णालयांमध्येही डिझेल साठा पुरेशा प्रमाणात असल्याची व जनित्रे सुरू असल्याची खातरजमा महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे सातत्याने करण्यात येत आहे. त्याचबरोबर इतर खाजगी रुग्णालयांमध्ये देखील काही अडचण आल्यास त्यांनी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन सर्व खाजगी रुग्णालयांना यापूर्वीच करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अनुषंगाने महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालयातील रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही व सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू आहे असेही महानगरपालिके द्वारे कळविण्यात आले आहे.

कोरोना होऊन गेल्यावर काय काळजी घ्यावी? नायर रुग्णालयाची पोस्ट कोव्हिड माहिती पुस्तिका

विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणताही संदेश अग्रेषित करण्यापूर्वी किंवा पाठवण्यापूर्वी सदर संदेशाची खातरजमा करून घ्यावी तसेच आवश्यकता भासल्यास संबंधित वीज वितरण कंपनी संपर्क साधून माहितीची खातरजमा करावीअसे आवाहन ही पालिका प्रशासनाने केले आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power cut has no effect on the hospital Explanation of Mumbai Municipal Corporation Administration

टॉपिकस