उकाड्यात सरली रात्र, दिवसाही त्याच वेदना...!

temperature raised
temperature raised

ठाणे : कडक उन्हाच्या झळांनी, कोंदट वातावरणाने आधीच जीवाची काहिली झाली असताना गेल्या 12 तासाहून अधिक कालावधीपासून बत्ती गूल झाल्याने डोंबिवलीकरांमधून महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. न्यू आयरे रोड परिसरात शुक्रवारपासून विजेचा लंपडाव सुरू होता. त्यात रात्री 10 वाजता बत्ती गूल झाली ती दुसऱ्या दिवशी दुपार होत आली तरी येण्याची चिन्हे दिसत नव्हती. रात्र कशीबशी सरली पण दिवसाही या वेदना आता सहन होत नसल्याची प्रतिक्रीया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. 

डोंबिवली पूर्वेतील न्यू आयरे रोड परिसरातील मढवी शाळेजवळील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याने 12 तासाहून अधिक काळ या परिसरातील बत्ती गूल आहे. शुक्रवारी दुपारी खंडित झालेला वीज पुरवठा सायंकाळी 6 वाजता सुरळीत झाला. परंतु रात्री 10 ला पुन्हा गेलेली वीज शनिवारी दुपारपर्यंत आलीच नसल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे सर्वच घरात बसून आहेत. काही नागरिक घरातून कार्यालयीन काम करीत आहेत, तसेच मुलांनाही मनोरंजन म्हणून पालक टीव्ही, व्हिडीओ गेम लावून देतात. परंतु विजेचा पत्ताच नसल्याने सर्वांचाच खोळंबा झाला.
 
वाढत्या गरमीने लहान मुले चिडचिड करू लागली आहेत. रात्रभर उकाड्याने लहान-मोठे सगळेच हैराण झाले, किमान दुसऱ्या दिवशी सकाळी वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा होती. परंतु दुपार होत आली तरी विजेचा पत्ता नसल्याने अखेर नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.

नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कर्मचारीही हैराण झाले. 
ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याने या भागातील 500 कुटुंबांना त्याचा फटका बसला. सायंकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे महावितरण विभागाकडून ग्राहकांना कळविण्यात आले. 

मढवी येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याने रात्रीपासून या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. कर्मचाऱ्यांची कमतरता व लॉकडाऊनमुळे दुरुस्तीकामात अडचणी आल्या. परंतु त्यावर मात करीत अखंड वीजसेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
- धनराज बिक्कड, 
कार्यकारी अभियंता डोंबिवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com