आज वाशीत पाच तास वीजपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने वाशी सेक्‍टर १ ते ८ आणि सेक्‍टर १७ येथील परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी (ता.२७) तब्बल पाच तास बंद करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने वाशी सेक्‍टर १ ते ८ आणि सेक्‍टर १७ येथील परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी (ता.२७) तब्बल पाच तास बंद करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. 

पावसाळी दिवस असल्यामुळे मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वारंवार वीज खंडित होऊ नये, म्हणून हा पाच तासांचा शटडाऊन महावितरणतर्फे घेण्यात आला आहे. या शटडाऊनमध्ये शंभर किलो व्हॅटच्या सबस्टेशनमधून जाणारी २२ किलो व्होल्टच्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीतील विद्युत प्रवाह बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे वाशी सेक्‍टर १ ते ८ आणि सेक्‍टर १७ दरम्यानच्या परीसरातील वीजपुरवठा पाच तासांकरिता बंद करण्यात येणार आहे; मात्र दुरुस्तीचे काम वेळेत संपल्यास तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power supply shut down for five hours today in vashi