दारूची दुकाने उघडली मग मंदिर का नाही ? प्रकाश आंबेडकर

सुमित बागुल
Wednesday, 26 August 2020

वारकऱ्यांकडून महाराष्ट्र शासनाला मंदिरं खुली करण्याची विनंती केली गेलीये.

मुंबई : राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत, भजन कीर्तन करायला परवानगी दिली जावी यासाठी वारकरी समुदायाने पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला असून, ते स्वतः 31 ऑगस्ट रोजी पंढरपुरात आयोजित आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी होणार आहेत.

राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या लॉकडाऊनचा विरोध करीत राज्यात आंदोलनाला सुरुवात केली. यापूर्वी लॉकडाऊनच्या विरोधात राज्यभर निवेदने देण्यात आली. त्यानंतर राज्य भरातील एसटी तसेच शहरांतर्गत चालणाऱ्या बसेस चालू करण्यात याव्यात, तसेच छोटे उद्योग धंदे चालू करण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून राज्यभर डफली वाजवून आंदोलन करण्यात आले. 

मोठी बातमी :  सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यालाच CBI नोटीस ?
 

आता राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी म्हणून 31 ऑगस्ट रोजी पंढरपूर या ठिकाणी हरि भक्त पारायण यांच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात येणार असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण उपस्थित राहणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर ?

वारकऱ्यांकडून महाराष्ट्र शासनाला मंदिरं खुली करण्याची विनंती केली गेलीये. आपण दुकाने उघडावीत, मॉल्स उघडलेत, तंबाखूची दुकाने उघडली, दारूची दुकाने उघडली, बसेस सुरु झाल्यात, ऑटो सुरू झाल्यात. तेंव्हा आपण पंढरपुरातील मंदिर भाविकांना आणि वारकऱ्यांना खुलं करावं असं त्यांनी आवाहन केलंय. मात्र शाशनाने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. वारकऱ्यांना माझं आवाहन आहे की, आपण आंदोलनाला पोहोचावं, मला सुद्धा निमंत्रण आहे. मी सुद्धा ३१ ऑगस्टला पंढरपुरात आहे. आपण सर्वांनी एकत्र जाऊन शासनावर दबाव आणू आणि वारकऱ्यांना पंढरपुरातील मंदिर खुलं करावं हा आग्रह आपण शासनाकडे करूया, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत . 

prakash ambedkar says if liquors shops and malls are opened then why not temples and prayer places


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash ambedkar says if liquors shops and malls are opened then why not temples and prayer places