प्रशांत दामले म्हणतायेत, कल्याणमधील रस्ते थर्ड क्लास

सुचिता करमरकर
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

: कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यावर येथील नागरिक प्रचंड नाराज आहेतच, मात्र शहरात विविध कारणांनी येणारे सेलिब्रिटीही आता शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर उघडपणे टीका करत आहेत. गणेशोत्सवादरम्यान एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत आलेल्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी भर कार्यक्रमात शहरातील रस्त्यांवर टीका केली होती. आता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही आपल्या फेसबुक अकाउंटवरून कल्याणातील रस्त्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यावर येथील नागरिक प्रचंड नाराज आहेतच, मात्र शहरात विविध कारणांनी येणारे सेलिब्रिटीही आता शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर उघडपणे टीका करत आहेत. गणेशोत्सवादरम्यान एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत आलेल्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी भर कार्यक्रमात शहरातील रस्त्यांवर टीका केली होती. आता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही आपल्या फेसबुक अकाउंटवरून कल्याणातील रस्त्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

रविवारी संध्याकाळी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग होता. या प्रयोगासाठी येताना शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रशांत दामले त्रस्त झाले. त्यामुळेच त्यांनी कल्याणतील नाट्यरसिक उत्तम, मात्र रस्ते थर्ड क्लास अशी टीका केली.

शहरातील रस्त्यांबाबत लोकप्रतिनिधींनी स्थायी समिती सभेत चर्चा केली होती याला उत्तर देताना पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रघुवीर शेळके यांनी दिलेल्या उत्तरामुळे पालिका प्रशासन यापूर्वीच टीकेचे धनी ठरले आहे. शेळके यांनी शहरातील पालिकेच्या रस्त्यापेक्षा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर अधिक खड्डे असल्याचे सभेत सांगितले होते.

पालिका प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे स्थायी समिती सदस्य, सभापती यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती. खड्डे बुजवा अन्यथा ठेकेदाराचा ठेका रद्द करु, अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी तंबीही सभापतींनी यावेळी दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prashant Damle says that the roads in Kalyan are third class