पक्ष महत्वाचा की सरकार उद्धव ठाकरेंना पडलेला प्रश्न- भाजप

कृष्ण जोशी
Thursday, 29 October 2020

 शिवसेना पक्ष संघटनेला महत्व द्यायचे की सरकारला महत्व द्यायचे हा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक एकहाती लढविण्याची घोषणा केल्याचे मत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. 

मुंबईः  शिवसेना पक्ष संघटनेला महत्व द्यायचे की सरकारला महत्व द्यायचे हा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक एकहाती लढविण्याची घोषणा केल्याचे मत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे दिवसेंदिवस शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याची जाणीव बहुदा मुख्यमंत्री ठाकरे यांना झाली असावी. कारण जेथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या मित्रपक्षांचे आमदार असतील तेथे स्थानिक शिवसैनिक काय काम करणार, त्या कामांचा फायदा कोणाला होणार आणि त्यामुळे त्यांनी कशासाठी आणि कोणासाठी काम करायचं, हे प्रश्न उपस्थित होतच असणार. त्याहीपेक्षा खालच्या पातळीवर म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती जर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या ताब्यात असतील तर तेथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मनातही हाच प्रश्न येत असणार. त्यामुळे त्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे, असेही दरेकर यांनी दाखवून दिले आहे. 

मित्रपक्ष आमदार असलेल्या किमान शंभर विधानसभा मतदारसंघात अशी परिस्थिती आहे. मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या वेगळ्याच. त्यामुळे येथील शिवसैनिकांना नेमके काय करावे ते कळतच नसणार. अशा शिवसैनिकांचा आत्मविश्वास जागवण्यासाठी आपण आता विधानसभा निवडणूक एकहाती लढवणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. असे केल्याने शिवसैनिकानाही न्याय मिळेल हा विश्वास देण्यासाठी ठाकरे यांनी एकहाती भगवा फडकवण्याची गोष्ट केल्याचेही दरेकर यांनी दाखवून दिली आहे. 

अधिक वाचा-  वाढीव वीज बिलाबाबत राज्यपालांना निवदेन; शरद पवारांशी बोला, राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला

महाविकास आघाडी सरकारमध्ये राहून पक्षाची ताकद कमी झाली तरी चालेल का की सत्ता नको पण पक्ष संघटना महत्वाची असा प्रश्न सध्या शिवसेनेला पडला आहे. एकाला महत्व दिले तर दुसऱ्याची ताकद कमी होणार अशी स्थिती आहे. यामुळे सध्या पक्षनेतृत्व द्विधा मनस्थितीत आल्याने आघाडीधर्माच्या विरोधात जाऊन एकहाती भगवा फडकावण्याचे वक्तव्य ठाकरे यांना करावे लागले आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

नियुक्त्यांमध्ये नियमभंग

नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून करावयाच्या कायमस्वरूपी नियुक्त्यांमध्ये नियमभंग झाल्याच्या तक्रारी येत आहेत. असे असेल तर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार पैसे देत असते आणि याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असते. या योजनेत वीस हजार नियुक्त्या होणार आहेत. यात खरेच नियमभंग झाले असतील तर त्याची तात्काळ चौकशी राज्य सरकारने करावी. तसेच यामागचा सूत्रधार कोण आहे हे राज्यातील जनतेसमोर आणून त्याच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी दरेकर यांनी केली आहे.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Praveen Darekar CM Uddhav Thackeray announced contest Assembly elections Shiv Sena


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praveen Darekar CM Uddhav Thackeray announced contest Assembly elections Shiv Sena