उद्या मंत्रालय गहाण ठेवणार का? ST कर्जप्रकरणी दरेकर यांची तिखट प्रतिक्रिया

कृष्ण जोशी
Friday, 30 October 2020

एसटी महामंडळ दोन हजार कोटींचे कर्ज घेऊन कर्मचा-यांचे 900 कोटींचे थकीत पगार व इतर खर्च करणार आहे.

मुंबई, ता. 30 : एसटीची मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज उभारण्याच्या प्रक्रियेवर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा एसटीच्या खासगीकरणाचा डाव असल्याची शंका येते आहे, उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी मंत्रालय गहाण ठेवाल का, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली आहे.  हा प्रकार महाराष्ट्राला शोभादायक नाही.

एसटीसाठी जर कर्ज घ्यायचे असेल तर राज्य सरकारची कर्ज घेण्याची क्षमता आहे. त्या माध्यमातून राज्य सरकारने कर्ज घेऊन बाँड काढावेत आणि एसटीचा कारभार चालवावा. पण एसटीची कुठलीही मालमत्ता गहाण ठेऊन पैसे उभारणे योग्य नाही, अशी भूमिका दरेकर यांनी मांडली.

महत्त्वाची बातमी : "किरीट सोमय्या यांना भाजपही सिरियसली घेत नाही" अनिल परब यांनी सोमय्यांना सुनावलं

एसटी महामंडळ दोन हजार कोटींचे कर्ज घेऊन कर्मचा-यांचे 900 कोटींचे थकीत पगार व इतर खर्च करणार आहे. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची नक्कीच आवश्यकता आहे. मात्र मालमत्ता गहाण ठेवणे हे रोगापेक्षा औषध भयंकर असे होईल. सध्या सरकारसमोर आर्थिक संकट आहे. परंतु शासकीय कर्मचा-यांना पगार द्यायचे असेल तर तुम्ही मंत्रालय गहाण ठेवणार का, असा प्रश्नही त्यांनी केला.

गहाण कर्जाच्या माध्यमातून खाजगीकरणाचा डाव असल्याची शंका येते. मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केल्यास एसटी महामंडळ कर्जबाजारी होईल. कुणीतरी खासगी कंपनीने अशा माध्यमातून एसटी महामंडळ ताब्यात घ्यावे, हा हेतू तर यामागे नाही ना, अशी शंकाही दरेकर यांनी व्यक्त केली. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

opposition leader pravin darekar targets thackeray government asks are you going to keep mantralaya for mortgage


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin darekar targets thackeray government asks are you going to keep mantralaya for mortgage