कल्याणमध्ये प्री-प्रेड रिक्षा-टॅक्‍सीचा मार्ग मोकळा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेरून रेल्वे प्रवासी वर्गासाठी प्री-प्रेड रिक्षा आणि टॅक्‍सी सेवा सुरू करण्याबाबत आज मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कल्याण आरटीओमध्ये सामंजस्य करार झाला. आगामी 15 दिवसांत ही सेवा सुरू करण्याचे आदेश कल्याण आरटीओ विभागाने संबंधित एजन्सीला दिले आहेत. 

कल्याण  : कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेरून रेल्वे प्रवासी वर्गासाठी प्री-प्रेड रिक्षा आणि टॅक्‍सी सेवा सुरू करण्याबाबत आज मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कल्याण आरटीओमध्ये सामंजस्य करार झाला. आगामी 15 दिवसांत ही सेवा सुरू करण्याचे आदेश कल्याण आरटीओ विभागाने संबंधित एजन्सीला दिले आहेत. 

रेल्वेस्थानका बाहेर रिक्षाचालक आणि टॅक्‍सीचालक प्रवासी वर्गाकडून वाढीव भाडे घेऊन त्रास देत असल्याच्या तक्रारींची दखल घेत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने कल्याणसह दादर, पनवेल, कुर्ला, ठाणे, रेल्वेस्थानकाबाहेरून प्री-प्रेड रिक्षा आणि टॅक्‍सी सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. याबाबत त्यांनी अहवालही मागितला होता. या धर्तीवर कल्याण रेल्वेस्थानक प्रशासनाने एक अहवाल बनवून मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभाग व्यवस्थापकांना सादर केला. 

दरम्यान, कल्याण रेल्वेस्थानक पश्‍चिमेला आणि मुंबईच्या दिशेने असलेले बेकायदेशीर टॅक्‍सी आणि रिक्षा स्टॅंड हटवून तेथे फूड प्लाझा आणि प्री-प्रेड रिक्षा आणि टॅक्‍सी स्टॅंड सुरू करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कल्याण आरटीओ अधिकारी संजय ससाणे आणि मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील मुख्य वाणिज्य निरीक्षक जी. सूर्यप्रकाश आणि पी. के. राजन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात रेल्वे आणि आरटीओमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. आगामी 15 दिवसांत ही सेवा सुरू करण्याबाबत संबंधित एजन्सीला आदेश दिल्याची माहिती संजय ससाणे यांनी दिली. आरटीओने दिलेल्या दरपत्रकानुसार रिक्षा आणि टॅक्‍सीचालकाला प्रवाशांकडून भाडे स्वीकारायचे आहे. 

लूटमारीला चाप 
कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरून बेकायदेशीर रिक्षा स्टॅंडमधून प्रवासी वर्गाची लूटमार होत असल्याचे वृत्त दैनिक "सकाळ'ने अनेकदा प्रसिद्ध केले आहे. तसेच रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी रेल्वे प्रशासन आणि रेल्वेमंत्री ते देशाचे पंतप्रधान यांना समाजमाध्यमाद्वारे या समस्यांबाबत अवगत केले आहे. आता प्री-प्रेड रिक्षा आणि टॅक्‍सी सुरू होणार असल्याने दादागिरी करणाऱ्या आणि वाढीव भाडे घेऊन प्रवासी वर्गाची लूटमार करणाऱ्यांना चाप बसणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre-paid rickshaw-taxi route opens in Kalyan!