
मुंबई पब्लिक स्कूलला पसंती
मुंबई - अद्ययावत आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधांमुळे देशात नावाजलेल्या मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये अर्थात मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून यंदा एक लाख नवे प्रवेश करण्याचे ध्येय शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. त्यासाठी मिशन ॲडमिशन ः एकच लक्ष्य - एक लक्ष ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या ५ दिवसांत तब्बल ११ हजार ५४९ नवे प्रवेश निश्चित झाले आहेत.
मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी होते. त्यासाठी शाळांच्या इमारती, अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून पालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ आहे. शिक्षण विभागाने यंदा ''मिशन ॲडमिशन ः एकच लक्ष्य – एक लक्ष'' या मोहीम अंतर्गत किमान १ लाख नव्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा निर्धार केला आहे. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा संचालित केल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये मिळून सद्यस्थितीत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही विद्यार्थी संख्या गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २९ हजारांनी वाढली आहे. प्रामुख्याने बालवाडी (नर्सरी) ते पहिली, दुसरी वर्गांमधील प्रवेश पालकांकडून सध्या निश्चित केले जात आहेत. ३१ जुलैपर्यंत पालिका शाळांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू राहील.
पालिका शाळांची खासियत
आकर्षक शालेय इमारत
स्वच्छता, सुरक्षेसाठी हाऊसकिपिंग
व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे शिक्षण
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टॅब
अद्ययावत क्रीडांगणे
वाचनालय, संगणक, विज्ञान, खगोलीय प्रयोगशाळा
विज्ञान कुतूहल भवन, शैक्षणिक सहली
शालेय पोषण आहार, शालेय साहित्य व अन्य
Web Title: Prefer Mumbai Public School
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..