राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण | सीरमकडून 9 लाख 63 हजार डोज प्राप्त

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 13 January 2021

राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्याला कोव्हिशिल्ड लशीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत.

मुंबई  : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्याला कोव्हिशिल्ड लशीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 511 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. तेथे वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर 7 लाख 84 हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. राज्यात 3 हजार 135 शीतसाखळी केंद्र उपलब्ध केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 

केंद्र सरकारने राष्ट्रीयस्तरावर कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट स्थापन केला आहे. त्यांच्या सूचनानुसार लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. फ्रंटलाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, महापालिका कर्मचारी आदींचा समावेश आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि व्याधीग्रस्त 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे. 

 

7.8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी 
कोविन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी 17 हजार 749 व्हॅक्‍सीनेटर्सची नोंदणी झाली आहे. 7 लाख 84 हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. 

3,135 शीतसाखळी केंद्रे 
राज्यात राज्यस्तरीय एक, विभागस्तरावर नऊ, जिल्हास्तरावर 34, महापालिकास्तरावर 27 शीतगृहे तयार असून 3 हजार 135 शीतसाखळी केंद्रे उपलब्ध आहेत. केंद्राकडून प्राप्त झालेल्या 1200 व्हॅक्‍सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

एका ठिकाणी किमान 100 जणांना लसीकरण 
आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान 100 जणांचे लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये 5 सदस्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 

जिल्हानिहाय केंद्रांची संख्या 
अहमदनगर- 21, अकोला- 5, अमरावती- 9, औरंगाबाद- 18, बीड- 9, भंडारा- 5, बुलडाणा- 10, चंद्रपूर- 11, धुळे- 7, गडचिरोली- 7, गोंदिया- 6, हिंगोली- 4, जळगाव- 13, जालना- 8, कोल्हापूर- 20, लातूर- 11, मुंबई- 72, नागपूर- 22, नांदेड- 9, नंदूरबार- 7, नाशिक- 23, उस्मानाबाद- 5, पालघर- 8, परभणी- 5, पुणे- 55, रायगड- 7, रत्नागिरी- 9, सांगली- 17, सातारा- 16, सिंधुदुर्ग- 6, सोलापूर- 19, ठाणे- 42, वर्धा- 11, वाशिम- 5, यवतमाळ- 9 अशी एकूण 511 केंद्रे आहेत. 

Preparations for vaccination completed in the state 9 lakh 63 thousand doses from serum

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for vaccination completed in the state 9 lakh 63 thousand doses from serum