'सध्याचे सरकार बंधुभाव, सामाजिक एकता याचा विचार करत नाही'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

समाजातील काही विशिष्ट समाज घटकांवर हल्ले केले जात आहेत; परंतु त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. 

मुंबई : देशाला जर विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल, तर बंधुभाव, सामाजिक एकता आवश्‍यक आहे. मात्र, आज ज्यांच्या हातात सरकार आहे, ते त्या गोष्टींचा विचार करत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. समाजातील काही विशिष्ट समाज घटकांवर हल्ले केले जात आहेत; परंतु त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचा भव्य मेळावा शनिवारी (ता.14) प्रदेश कार्यालयात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. राज्यात 70 टक्के लोक शेती करतात. राज्यात काही ठिकाणी सुका दुष्काळ आहे, तर काही ठिकाणी पूरस्थिती आहे. लोकं दुहेरी संकटात आहेत. संकटामध्ये आधार देण्याची जबाबदारी सरकारची होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका तासासाठी सांगलीला आले होते, त्यानंतर तिकडे पुन्हा पाऊल ठेवले नाही. 

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत राज्याचे प्रमुख गेले ना देशाचे प्रमुख, मात्र सांप्रदायिक विचार कसे पसरवले जातील यावर काम केले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. 
समाजामध्ये अशांती कशी पसरली जाईल, यासाठी काही पब्लिकेशन काम करत आहेत. एका वेगळ्या प्रकारच्या विचारधारेचा प्रसार केला जात आहे. आम्ही भारतामध्ये राहातो हे सांगण्याची आवश्‍यकता का आहे. परंतु आज बंधुभाव, समतेवर हल्ला होत आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

आजच्या सरकारने काश्‍मिरातील विशेष अधिकार बाजूला केले आहेत. याला विरोध नाही, परंतु लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते. पाकिस्तानची जनतेला कधीही वाटत नाही की भारत-पाक युद्ध व्हावे, असे सांगतानाच पाकिस्तानात भारतीय संघ घेऊन गेल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. मॉब लिचिंगचा शब्द कधी ऐकला आहे का. परंतु हा शब्द आज ऐकायला सारखा मिळत आहे. यांच्याविरोधात एकत्र येण्याची आवश्‍यकता आहे, असेही शरद पवार म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडीवर टीका 
शरद पवार यांनी वंचित आघाडीचाही समाचार घेतला. आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापना झाली आहे. आपल्या पार्टीचे नाव काय ठेवावे हा त्यांचा अधिकार आहे. गरीब लोकांसाठी ही पार्टी आहे, असं सांगण्यात आले; परंतु मदत भाजपलाच झाली, असा टोला लगावतानाच अशा सर्व विचारांना सडेतोड जवाब देताना ही परिस्थिती बदलण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने पुढे येण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Present government does not consider fraternity and social unity says Sharad Pawar