नवी मुंबईत झेंडूचा भाव वधारला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी वाशीमध्ये दाखल झाले असून, शिवाजी चौक परिसर हा झेंडूच्या फुलांनी बहरला आहे. यंदा अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उत्पन्न कमी झाल्याने झेंडूच्या फुलांचा भाव हा ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे.

नवी मुंबई : झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी वाशीमध्ये दाखल झाले असून, शिवाजी चौक परिसर हा झेंडूच्या फुलांनी बहरला आहे. यंदा अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उत्पन्न कमी झाल्याने झेंडूच्या फुलांचा भाव हा ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे; मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा भाव हा कमी आहे; तर गणेशोत्सवाच्या काळात झेडूंची फुले १५० रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. यंदा झेंडूच्या फुलांची आवक कमी असून, फुलांचे भाव हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात तसेच व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या भावापेक्षा फुलांची थेट विक्री केल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळत आहे. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी वाशी परिसरात फुलांची विक्री करण्यासाठी दाखल झाले आहे. या वर्षी पिवळा आणि लाल रंगाचा गोंडा, शेवंती आणि अष्टरच्या फुलांना चांगली मागणी आहे.

फुले    दर (रुपये/प्रति किलो)
झेंडू (पिवळा)     ८० ते १००
झेंडू (नारंगी)     ८० ते १२०
झेंडूची (कोलकत्ता)     १२० ते १६०
अष्टर     २००
शेवंती     २५०
गुलछडी     ४०० ते ५००
मोगरा     ८०० ते १०००
गुलाब     ८० रुपये डझन.

यंदा हवामानात होणारा बदल व अतिवृष्टी यांचा फटका फुलांना बसला असून, उत्पन्न कमी झाल्याने फुलांचे भाव वाढले आहेत. त्यातच वाढत्या डिझेलच्या दरामुळे वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे. सणांच्या दिवसांमुळे बाजारात मागणी अधिक असल्याने फुलांचे भाव वाढले आहेत.
- विश्‍वनाथ पुंडे, फुल विक्रेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of marigold increased in Navi Mumbai