esakal | मास्कच्या किमतीचा बाजार कडाडला; दुकानदारांची तक्रार कोणाकडे करावी, याबाबत संभ्रम 
sakal

बोलून बातमी शोधा

मास्कच्या किमतीचा बाजार कडाडला; दुकानदारांची तक्रार कोणाकडे करावी, याबाबत संभ्रम 
  • महागड्या मास्कमुळे बोलती बंद 
  • सरकारी धोरणाचा फटका;
  • दुकानदारांची तक्रार कोणाकडे करावी, याबाबत संभ्रम 

मास्कच्या किमतीचा बाजार कडाडला; दुकानदारांची तक्रार कोणाकडे करावी, याबाबत संभ्रम 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई : कोरोनामुळे धास्तावलेल्या आणि सरकारने मास्क लावणे अनिवार्य केल्याने मास्कच्या किमतीचा बाजार कडाडला. सरकारने मास्कच्या किमती नियंत्रित केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात अनेक दुकानांत मास्क चढ्या दरानेच विकले जात आहेत. किमती कमी करूनही सरकारच्या निर्देशांना केराची टोपली दाखवत ग्राहकांची लूट सुरू असल्याचे दिसते. दुसरीकडे सरकारच्या धोरणांची सर्वसामान्यांना माहिती नाही. मास्क व सॅनिटायझरच्या दर्जाबाबतही सामान्यांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे ग्राहकांनी अव्वाच्या सव्वा किमतीला माल विकत घेतला. आता वाढीव दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांची तक्रार कोणाकडे करावी, याबाबतही संभ्रम आहे. 

राज्य सरकारने मास्कचे दर कमी केले असून, एन-95 मास्क 19 ते 49 रुपये, तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क तीन ते चार रुपये दर निर्धारित केले आहेत. राज्यातील मास्कची आवश्‍यकता लक्षात घेता उत्पादकाने राज्यात उत्पादित केलेला व राज्यात आवश्‍यक असलेला माल विहीत दराने उपलब्ध करून देणे आवश्‍यक राहील. विविध दर्जाच्या मास्कची विहीत केलेली अधिकतम विक्रीमूल्य मर्यादा ही साथरोग कायदा अमलात असेपर्यंत लागू राहणार आहे. याप्रकरणी काही तक्रार उद्‌भवल्यास राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हा स्तरावर, जिल्हाधिकारी हे तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असतील असे जाहीर केले. 
प्रत्यक्षात बाजारात साधा होममेड मास्क 30 रुपयांना विकला जातोय, तर दोन पदरी, तीन पदरी मास्क 60 ते 70 रुपयांना आणि एन-95 मास्क आजही शंभर रुपयांच्या आसपास विकला जात आहे. यामुळे होममेड फॅन्सी मास्कला मोठी मागणी असल्याचे दिसते; मात्र त्याची गुणवत्ता याच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह आहे. असे असले तरी दंडापासून संरक्षण मिळावे तसेच एन-95 मास्क महाग मिळत असल्याने होममेड मास्कचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. 

याबाबत दुकानदारांना विचारले असता आपण जुना माल वाढीव किमतीत विकत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुकानात असलेला माल आम्ही याआधीच वाढीव किमतींना घेतला आहे. तो माल आता आम्ही कमी किमतीत कसा विकणार, असा सवाल ते विचारत आहेत. हा माल संपल्यानंतर नवीन माल आम्ही सरकारने निर्धारित केलेल्या किमतीत विकू, असेही दुकानदार सांगतात. 

सरकारने निर्धारित केलेल्या दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक आहे. चढ्या दराने मास्क विक्री करणे कायद्याचे उल्लंघन आहे. तक्रारी आल्यास संबंधित जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. 
- राजेश टोपे,
आरोग्यमंत्री 

सरकारने मास्कच्या किमती निर्धारित केल्या आहेत. त्यानुसार मास्कची विक्री करणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधित जिल्हाधिकारी तसेच राज्यात अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करू शकते. 
- डॉ. सुधाकर शिंदे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, मफुजआयो 

सरकारी धोरणाबाबत सर्वसामान्य अनभिज्ञ 
गोरेगाव ः राज्य सरकारने धोरण आखून मास्कच्या किमती कमी केल्या आहेत. गोरेगाव परिसरातील काही दुकानदार नव्या दरानुसार मास्कची विक्री करत आहेत; मात्र नव्या दराबाबत लोक अद्याप अनभिज्ञ आहेत. गोरेगावमधील एवन केमिस्टचे मालक प्रमोद सिंग यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, एन-95 आणि अन्य प्रकारच्या मास्कचा आमच्याकडे जुना मोठा स्टॉक आहे. सरकारच्या नवीन निर्देशांमुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. माझ्यासारख्या व्यावसायिकांनी काय करायचे, असा सवालही सिंग यांनी विचारला. 

वेदांत मेडिकल स्टोअर्सच्या अमृतलाल शहा यांनी सांगितले की, मास्क आणि सॅनिटायझरच्या गुणवत्तेवर कोणाचे नियंत्रण होते? या दोन्ही वस्तू कोठेही आणि कशाही विकल्या जात होत्या. सर्वसामान्यांची फसवणूक झाली तेव्हा सरकार कुठे होते, असा सवालही शहा यांनी विचारला. 

100 ते 150 रुपयांना विकलेले मास्क आता 30-40 रुपयांतही कोणी घ्यायला तयार नाही. उच्च दर्जाच्या सॅनिटायझरची मोठी खरेदी केली. आज बाजारात 50 रुपयांतही सॅनिटायझर उपलब्ध झाले. त्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला. साधे कपड्याचे मास्क 150-200 रुपये शेकड्याने आता मिळत आहेत. त्यातच कॅप असलेल्या एन-95 मास्कवर डब्ल्यूएचओने बंदी आणल्यानेही नुकसान झाल्याचे अरिहंत केमिस्ट यांनी सांगितले. सरकारच्या धोरणांची सर्वसामान्यांना माहिती नाही. मास्क व सॅनिटायझरच्या दर्जाबाबतही सामान्यांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे ग्राहकांनी अव्वाच्या सव्वा किमतीला माल विकत घेतला. वाढीव दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांची तक्रार कोणाकडे करावी, याची माहिती सामान्यांना नाही, असे साद-प्रतिसाद सामाजिक संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप सावंत यांनी सांगितले. 

मेडिकल स्टोअर्समध्ये एन-95 मास्क महाग 
मुंबादेवी ः जेजे परिसरातील मेडिकल स्टोअर्समध्ये दोन लेअर्स किंवा तीन लेअर्स मास्क विक्रीकरता उपलब्ध नाहीत. त्यामुळे लोकांना महागडे मास्क विकत घ्यावे लागत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. जेजे रुग्णालयात समोर एक नजर फिरवली तर रांगेत अनेक औषध विक्रीची दुकाने पाहायला मिळतात. या दुकानांमध्ये मास्कची चौकशी केली असता 19 ते 49 रुपये किमतीचे मास्क विक्रीस नसल्याचे मेडिकल स्टोअर्समधील विक्रेत्यांनी सांगितले; मात्र 50 ते 150 पासून अगदी 300 रुपयांपर्यंतचे मास्क विक्रीस असल्याचे दिसले. जनरिको मेडिकल स्टोअर्समध्ये माफक दरात औषधे मिळतात; मात्र येथील बऱ्याच दुकानांत एन-95 मास्क विक्रीस नाहीत. मॅन्युफेक्‍चरिंग कंपनीकडून मास्क कमी किमतीत विक्रीबाबत सांगण्यात आले; परंतु आमच्याकडे एन-95 मास्क उपलब्ध नाहीत. साधे मास्क तीन रुपये किमतीत विकत असून, तशी सूचना कागदावर लिहून दर्शनी भागात लावल्याचे व्यापारी महंमद शेख यांनी सांगितले. अन्य दुकानात चौकशी केली असता काही ठिकाणी एन-95 मास्क विक्रीस नाहीत, तर काहीजण 300 रुपये किमतीत मास्क विकत आहेत. 

दादरमध्ये सर्वसामान्यांना दिलासा 
दादर ः विविध प्रकारच्या एन-95 मास्क 19 ते 40 व साधे दुपदरी तीन पदरी मास्क तीन ते चार रुपयांपर्यंत दराने विक्री करण्यात येत असल्याचे चित्र दादर प्रभादेवी परिसरात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतोय. 

सरकारने दिलेल्या सूचनेनुसार मास्कच्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीतून येणारा मालही कमी दरात येत असल्याने आम्ही एन-95 मास्कची विक्री 19 रुपयात, तर तीन पदरी मास्कची विक्री चार रुपयांत करीत आहोत. 
- गजानन बेर्डे,
अनघा मेडिकल 

विविध दर्जानुसार एन-95 मास्कची किंमत 16 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध आहे. पूर्वी हेच मास्क जास्त दराने विकले जात होते; मात्र आता मास्क आणि सॅनिटायझरचे दर कमी झाले आहेत. 
- राकेश शाह,
सर्जिकल हेल्थ केअर 

पूर्वी एन-95 मास्कची किंमत जास्त होती. आता त्याची किंमत कमी करण्यात आली आहे. खरे तर यापूर्वीच मास्कची किंमत कमी करायला हवी होती. कारण त्या वेळी मास्कची खरी गरज होती. 
- स्वप्नील मुंज,
ग्राहक 

कोरोनाचा प्रादुर्भाव ज्यावेळी जास्त होता त्या वेळेस जास्त दराने मास्कची विक्री करण्यात आली. याचा फायदा सरकारला झाला. आता जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा दर कमी करून त्याचा फारसा फायदा नगरिकांना होणार नाही. 
- प्रफुल सुर्वे,
ग्राहक 

--------------------------------------------------------

( संकलन ः मिलिंद तांबे, दिनेश चिलप-मराठे, राजू परुळेकर, नीलेश पाटील, रजनीकांत साळवी, दिलीप यादव 
: संपादन - तुषार सोनवणे )

loading image