बेटी बचाओ घोषणा देणारे पंतप्रधान गप्प का? प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सवाल

कृष्ण जोशी
Sunday, 4 October 2020

भाजपशासित राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. "बेटी बचाओ'चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. अशा स्थितीत भाजपच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उद्या (ता. 5) कॉंग्रेस राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांसमोर सत्याग्रह करणार आहे. आपण स्वतः मुंबई येथे सत्याग्रहात सहभागी होऊ, असेही थोरात म्हणाले. 
 

मुंबई ः "बेटी बचाव'ची घोषणा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हाथरस प्रकरणानंतर मूग गिळून गप्प का आहेत? कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या कपड्यांना हात लावण्यापर्यंत पुरुष पोलिस अधिकाऱ्यांची मजल जाते, ही बाब आदित्यनाथ सरकारची महिलांबाबतची हीन मानसिकता दाखवते. भाजपचा हा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महसूलमंत्री व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

एनसीबी भाजपच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार, काँग्रेसचा सवाल

 
भाजपशासित राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. "बेटी बचाओ'चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. अशा स्थितीत भाजपच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उद्या (ता. 5) कॉंग्रेस राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांसमोर सत्याग्रह करणार आहे. आपण स्वतः मुंबई येथे सत्याग्रहात सहभागी होऊ, असेही थोरात म्हणाले. 

 

पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला? उत्तर प्रदेश सरकारने वारंवार दिशाभूल का केली? पीडित कुटुंबाला धमक्‍या का दिल्या? तसेच जाळण्यात आलेला मृतदेह पीडितेचाच होता यावर विश्‍वास कसा ठेवायचा, या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याचा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि उत्तरे योगी आदित्यनाथ सरकारला द्यावीच लागतील. अशा परिस्थितीत हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करावी. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या. 

 

सत्तेचा माज जनताच उतरवेल! 
हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लागली; पण योगी सरकारची संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकूमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्‍या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. हाथरसला जाणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला झाला. प्रियंका गांधी यांच्या कपड्यांना हात लावण्यापर्यंत मस्तवाल पुरुष पोलिस अधिकाऱ्यांची मजल केली. भाजपचा हा सत्तेचा माज जनता जरूर उतरवेल, असा इशाराही थोरात यांनी दिला. 

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is the Prime Minister silent while announcing Save the Daughter? Question of Pradesh Congress President Balasaheb Thorat