खासगी रुग्णालयांना नवी मुंबई आयुक्तांचा दणका; रुग्णांना ज्यादा आकारलेले पैसे परत

शुभांगी पाटील
Sunday, 13 September 2020

मनसेने आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चांगलाच दणका दिला आहे.

तुर्भे : मनसेने आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चांगलाच दणका दिला आहे. बांगर यांच्या दणक्यानंतर खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचाराच्या नावाखाली ज्यादा आकारलेल्या बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली आहे. 

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला BMC कडून सुरूवात; घरोघरी जात स्वयंसेवक तापमान तपासणार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे अनेक जण उपचारासाठी नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. या रुग्णालयांकडून मात्र उपचाराच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे, याबाबतच्या तक्रारी अनेकदा मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत मनसेच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची 4 सप्टेंबरला भेट घेतली. या वेळी त्यांनी रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर ठोस कारवाई करण्याची मागणी करत आयुक्तांना लेखी निवेदन दिले होते. तसेच, सात दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर खासगी रुग्णालयाचे तारणहार म्हणून आयुक्तांना पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना चांगलाच दणका दिला.

काय सांगता! मेट्रोमुळे मुंबईत मलेरियाचा प्रसार? दक्षिण मुंबईत 70 टक्के रुग्ण; इमारतींमध्येही वाढता धोका

या सर्व रुग्णालयांनी ज्यादा आकारलेल्या बिलाचे पैसे रुग्णांना परत करण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने पी.के.सी. हॉस्पिटल (वाशी), एम.पी.सी.टी हॉस्पिटल (सानपाडा), एम.जी.एम. हॉस्पिटल (बेलापूर), फोर्टिज हॉस्पिटल (वाशी), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेरूळ), रिलायन्स हॉस्पिटल (कोपरखैरणे), अपोलो हॉस्पिटल (बेलापूर), ग्लोबल हॉस्पिटल (वाशी), राजपाल हॉस्पिटल (कोपरखैरणे), तेरणा हॉस्पिटल (नेरूळ); तसेच सनशाईन हॉस्पिटल (नेरूळ) या रुग्णालयांनी एकूण 32 लाख रुपये आतापर्यंत परत केले आहे. याबाबत महापालिकेने मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे.

बिलांच्या पडताळणीसाठी विशेष पथके
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या आतापर्यंतच्या संपूर्ण बिलांची पडताळणी करण्यासाठी विशेष लेखा परिक्षण पथके तयार केली आहेत. ही पथके सात दिवसांत रुग्णालयांच्या बिलाच्या तक्रारीबाबत पडताळणी करतील. त्यानंतर ज्यादा आकारलेल्या बिलांचे पैसे परत करणे, दोषी रुग्णालयांवर गुन्हा दाखल करणे अथवा रुग्णालयाची मान्यता निलंबित करण्याबाबतची आवश्यक कायदेशीर कारवाई करणार आहे. असे महापालिकेने मनसेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू
रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात तक्रार करण्यासाठी 022-27567389 हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. तसेच 7208490010 हा व्हॉट्सअप नंबर सुद्धा कार्यान्वित केला असून यावरही तक्रार नोंद करू शकता.

 

जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत खासगी रुग्णालयांच्या लूटमारी विरोधातला आमचा लढा सुरूच राहील. तूर्तास आम्ही आयुक्तांच्या विनंतीवरून आंदोलन स्थगित करत आहोत.
- गजानन काळे,
शहराध्यक्ष, मनसे, नवी मुंबई

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private hospitals hit by Navi Mumbai Commissioner