esakal | नवी मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी!
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी झाली आहे

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी वाहतनतळांचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. 

नवी मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी वाहतनतळांचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शहरातील उपलब्ध वाहनतळांची संख्या आणि सिडकोकडून मिळालेल्या भूखंडांवर उभारता येणाऱ्या वाहनतळांच्या संख्येचा ताळमेळ करून सहा हजार ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच मॉल्स आणि व्यावसायिक इमारतींकडून अंतर्गत वाहनतळांचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही नगररचना विभागाला दिले आहेत. 

शहरातील वाहतूक कोंडी आणि वाहनतळांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महापालिकेचे संबंधित विभाग आणि वाहतूक पोलिस विभाग यांच्या बैठकीचे मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मिसाळ यांनी वाहतूक कोंडी आणि वाहनतळाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच निश्‍चित कालमर्यादाही आखून दिल्या. सद्यस्थितीत पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा आणि आवश्‍यकता यांचा तुलनात्मक अभ्यास करून कार्यकारी अभियंता यांना क्षेत्रनिहाय माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. पार्किंगच्या जागा किती प्रमाणात व कुठे वाढविल्या जाऊ शकतात, याचाही अंदाज घेण्याचे सांगितले. 

या दृष्टीने रस्त्यांची रुंदी तपासणी तसेच सद्यस्थितीतील पार्किंग भूखंड वापरण्यायोग्य आहेत काय व पार्किंगसाठी उपयोगी आहेत काय, यांची पाहणी करून व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन, त्यांची उपयोगिता तपासून कार्यकारी अभियंता यांनी एक महिन्यांच्या आत माहिती संकलित करण्यास मिसाळ यांनी सांगितले. 

वाहतूक विभागालाही लावले कामाला
शहरातील विविध प्रकारच्या वाहनांची संख्या तसेच पार्किंगच्या उपलब्ध आणि संभाव्य जागा यांच्या अभ्यासानंतर वाहतूक विभागाशी चर्चा करून निश्‍चित केल्या जाणार आहेत. वाहनतळांचे मार्किंग करणे, विनामूल्य पार्किंग व पे अँड पार्किंगच्या जागा व मूल्य ठरविणे आदी गोष्टी केल्या जाणार आहेत.  

टप्प्या-टप्प्याने विकास
जागा निश्‍चिती व नियोजन झाल्यानंतर पुढच्या टप्प्यात स्मार्ट सर्वसमावेशक पार्किंग धोरण तयार करण्यात येणार आहे. वाहनचालकांना गरज असेल, त्या वेळी शहरातील कोणत्या पार्किंगच्या जागा रिकाम्या आहेत, याची माहिती एका ॲपद्वारे मिळू शकेल. वाहनचालक ऑनलाईन पार्किंग जागाही आरक्षित करू शकतील, अशी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सोपे होणार आहे.           

मॉलवर कारवाई?
शहरात विभागनिहाय विविध मॉल्स सुरू आहेत. या मॉल्सच्या तळघरात वाहनतळांचे नियोजन असतानाही त्याचा वापर इतर कामांसाठी केला जातो. त्यामुळे मॉलमध्ये येणारा ग्राहक रस्त्यावर वाहन उभे करतो. त्यामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालकांना जागेअभावी मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागत असल्याने संध्याकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होते. अशा मॉल्स व्यवस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त मिसाळ यांनी दिले आहेत.  

शहरात वर्तमान आणि भविष्य काळात वाहतूक कोंडी व वाहनतळांची समस्या जाणवू नये, म्हणून वाहनतळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाचे काम सुरू आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका. 
 

loading image
go to top