मुंबई रेवस मांडवा फेरीप्रवासी समस्यांबाबत पोर्टट्रस्टला साकडे

कृष्ण जोशी
Tuesday, 22 December 2020

मुंबईतील भाऊचा धक्का-फेरी वार्फ, गेटवे ऑफ इंडिया येथून फेरीबोटींनी रेवस-मांडवा-अलिबाग येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्यांबाबत प्रवासी संघटनांनी मुंबई पोर्टट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांची भेट घेऊन त्या सोडविण्याचे साकडे त्यांना घातले. 

मुंबईः मुंबईतील भाऊचा धक्का-फेरी वार्फ, गेटवे ऑफ इंडिया येथून फेरीबोटींनी रेवस-मांडवा-अलिबाग येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्यांबाबत प्रवासी संघटनांनी मुंबई पोर्टट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांची भेट घेऊन त्या सोडविण्याचे साकडे त्यांना घातले. 

ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनतर्फे नुकतीच या प्रश्नांवर जलोटा यांची भेट घेऊन, त्यांना समस्या सांगण्यात आल्या. यावेळी प्रवासी संघटनांनी आपल्या मागण्याही त्यांच्यासमोर ठेवल्या. गेटवे ते मांडवा आणि फेरी वार्फ ते रेवस मोरा या जलमार्गावर दरवर्षी ३५ ते ४० लाख प्रवाशांची वाहतूक होते. गेटवे ऑफ इंडियावरून मांडवा, जेएनपीटी, घारापुरी येथे बोटी जातात तसेच पर्यटकांना समुद्रात फेरी मारण्यासाठीही तेथूनच बोटी सुटतात. येथील प्रवासी धक्के अपुरे असल्याने अद्ययावत जेट्टी बांधण्याच्या प्रकल्पाला गती द्यावी अशी मागणी करण्यात आली.

 मुंबईकरांचा प्रवास महागणार का ? आज रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीवर होणार निर्णय

भाऊच्या धक्क्याशेजारील बंदरातून दुपारपर्यंत मासेव्यापार चालतो, तेथे तसेच भाऊच्या धक्क्यावरील प्रवासी टर्मिनलसमोर मोठ्या प्रमाणावर असलेली अस्वच्छता दूर करावी. येथे अवैध वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने मोरा आणि रेवस येथून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई जाण्यासाठी बस मिळणे कठीण होते. ही गर्दी दूर करण्याचे प्रयत्न व्हावेत. भाऊच्या धक्क्यावरील मोठ्या भिंतीमुळे वारा अडत असल्याने प्रवाशांची घुसमट होते. हवा खेळती राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. टर्मिनलमधील सध्या बंद असलेली थंड पाण्याची व्यवस्था पुन्हा सुरु करावी, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पर्यटन मोसमात मुंबईतून अलिबाग ते मुरूड जंजिरा येथपर्यंत मोठ्या संख्येने पर्यटक जातात. त्यांच्याकडून फेरीबोटीचे चढ्या दराचे भाडे वसूल करण्यात येते. वारंवार भाडेवाढ केली जाते. पण त्याबदल्यात त्यांना फारशा सोयी दिल्या जात नाहीत. त्यामुळे मनमानी भाडेवाढीवर निर्बंध लादून याबाबत सर्वानुमते निर्णय घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले. पोर्ट ट्रस्टच्या वडाळा माहूल रस्त्यावर दिवे नसल्याने संध्याकाळनंतर नागरिकांची होणारी गैरसोय, न्यू फेरी वार्फ ते मांडवा मार्गावर नव्याने सुरु झालेली रोपॅक्स बोटसेवा, वॉटर टॅक्सी सेवा आणि प्रस्तावित नेरुळ मुंबई रोरो सेवा या मुद्यांवरही चर्चा झाली. या सर्व समस्या सोडविण्यासाठी जलोटा यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Problems of passengers traveling to Rewas Mandwa Alibag Mumbai Port Trust


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems of passengers traveling to Rewas Mandwa Alibag Mumbai Port Trust