
मुंगूर माशाची पैदास आणि पालनावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. तरीदेखील खालापूर तालुक्यातील तळ्यांमध्ये सर्रास मुंगूर मासेपालन होत असल्याचे समोर आले आहे.
खालापूर : मुंगूर माशाची पैदास आणि पालनावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. तरीदेखील खालापूर तालुक्यातील तळ्यांमध्ये सर्रास मुंगूर मासेपालन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याविरोधात त्वरित कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
खालापूर तालुक्यात वणवे, महड, चौक कोपरी भागात मोठ्या प्रमाणात मुंगूर माशाचे तलाव आहेत. पाताळगंगा नदीलगत हे तलाव असून मोठ्या प्रमाणात मुंगूर माशाची पैदास केली जाते. याठिकाणी पश्चिम बंगालमधून आणलेले कामगार कामासाठी ठेवले जातात. अतिशय गलिच्छ पाणी आणि सडलेले खाद्य मुंगूर माशांना खाण्यास दिले जाते. सडलेले मांस, चिकनचा कचरा पिकअपमधून आणल्यानंतर बंगाली कामगार यंत्रावर लगदा करून माशांना ते खाण्यास देतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून हे तलावातील घाण पाणी नदिपात्रात सोडले जात असल्याने पाताळगंगाही प्रदूषित होत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी सांगितले.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
यापुर्वी नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी महड तलावाची पाहणी करून खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला होता. परंतु, पुन्हा मुंगूर पालन व्यवसाय तेजीत सुरू असल्याने शासनाने कारवाईचा बडगा उगारावा आणि कायमस्वरूपी तलाव बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खालापूर हद्दीत ज्या तलावांत मुंगूर माशांचे पालन होते, ते तलाव बंद करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांडे पत्राद्वारे केली आहे. नगरपंचायत देखील कारवाईसाठी आग्रही आहे.
- सुरेखा शिंदे,
मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत
Production of mungur fish continues in Khalapur
---------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )