रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

पूजा विचारे
Tuesday, 8 September 2020

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

मुंबईः आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यास भाजप आमदार वेलमध्ये उतरले. भवनात एकच गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेनेचे अनिल परब आणि भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी विधानसभा तहकूब करण्यात आली होती.

अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेनं केला आहे. विधीमंडळ पावसाळी अधिवेशना दरम्यान शिवसेना सभागृहात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यानं गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील सरकारविरोधात गोस्वामी यांनी आक्रमक  पवित्रा घेतला. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांवर टीका केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरनाईक यांनी विधानसभेत मांडलेला हा प्रस्ताव पारित झाल्यास अर्णब यांच्यावर सभागृहाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रताप सरनाईक यांनी मागणी केली की, अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत असून अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करताहेत. त्यांची रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात असं घटना म्हणते. अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झालीच पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचं का?, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. 

Proposal of infringement against Republic editor Arnab Goswami


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal of infringement against Republic editor Arnab Goswami