अलिबागच्या नव्या स्थानकाची निवीदा मंजुरीचा प्रस्ताव धुळ खात पडून

प्रकल्पासाठी सहा कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित
alibag bus stand
alibag bus standsakal

अलिबाग : ६० वर्षे जुन्या अलिबाग एसटी स्थानकाला नवे रूप देण्यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये मोठ्या थाटामाटात भूमिपूजन सोहळा पार पडला. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असताना तीन वर्षे उलटूनही निविदा मंजुरीचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर धूळ खात पडून आहे. त्यामुळे नव्या एसटी स्थानकाचे काम लांबणीवर गेले आहे. या प्रकल्पासाठी सहा कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

रायगड जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अलिबागमध्ये पर्यटन वाढीला चालना मिळू लागली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ६० वर्षे जुन्या एसटी स्थानकाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय २०१९ मध्ये एसटी महामंडळाने घेतला. स्थानकातील मातीचे पुणे येथील डिरोक्ट्रीक इंजिनिअरिंग या कंपनीकडून मे २०१९ मध्ये परिक्षण करून इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला. तळ मजला व पहिला मजला अशी ही इमारत बांधण्यात येणार आहे.

स्थानकात जाण्या-येण्याचा मार्ग वेगळा असून प्रवाशांसाठीही वेगळा मार्ग आहे. आराखड्यानुसार तयार करण्यात येणाऱ्या स्थानकाच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ ऑगस्ट रोजी झाला होता. या नव्या स्थानकाचे काम १८ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २०२१ पर्यंत काम होणे अपेक्षीत होते. मात्र तीन वर्षांनंतरही या कामाची सुरुवात झाली नाही.

स्थानकाच्या कामाची निविदा १९ सप्टेंबरला मागविण्यात आली होती. निविदा उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आल्या; परंतु मंत्रालय स्तरावर त्याला मंजुरी प्राप्त झाली नाही. विद्यमान परिवहन मंत्र्यांकडून मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.

असा आहे स्थानकाचा आराखडा

अलिबाग एसटी स्थानकातील तळ मजल्यावर १४ फलाट आहेत. प्रवाशांसाठी खास प्रतीक्षालय, उपाहारगृह, प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक कार्यालय असणार आहे. पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगळे कक्ष असणार आहे. सुमारे एक लाख प्रवासी ये-जा करण्याची क्षमता नव्या स्थानकात असणार आहे. ७ हजार ६३० चैारस फूट इतक्या क्षेत्रावर नवीन स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

स्थानकावर दृष्टिक्षेप

  • जागेचे एकूण क्षेत्रफळ (चौरस मीटर) १९ ५३०

  • आगाराचे क्षेत्रफळ (चौरस मीटर) : ११ ०००

  • बस स्थानकाचे क्षेत्रफळ (चौरस मीटर) : ७६३०

  • आगार निवासस्थानाचे क्षेत्रफळ (चौरस मीटर) - ९००

  • वास्तुविशारद - गोडबोले मुकादम अॅन्ड असोसिएट्स

अलिबाग एसटी स्थानकासाठी निविदा मंजुरी प्रस्ताव मंत्रालय स्तरावर आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कामाला सुरुवात केली जाईल.

- भिल्लाकर, कार्यकारी अभियंता, एसटी महामंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com