केस गळतीवर "क्‍यूआर 678 थेरपी'; केमोथेरपीनंतर रुग्णांना वरदान ठरणारा फॉर्म्युला 

भाग्यश्री भुवड
Thursday, 21 January 2021

केमोथेरपीचा नकारात्मक परिणाम केसांवर होत असल्याने केस गळतीचे प्रमाण वाढते. अशा रुग्णांकरिता आता क्‍यूआर 678 थेरपी वरदान ठरली आहे

मुंबई  : केमोथेरपीचा नकारात्मक परिणाम केसांवर होत असल्याने केस गळतीचे प्रमाण वाढते. अशा रुग्णांकरिता आता क्‍यूआर 678 थेरपी वरदान ठरली आहे. 2008 मध्ये शोधलेल्या या फॉर्म्युल्याचे हे पेटंट डॉ. देबराज शोम आणि डॉ. रिंकी कपूर यांनी मिळवले आहे. या थेरपीमध्ये त्वचेतून क्‍यूआर 678 हे केसांच्या वाढीसाठी पोषक असणारे रेणू विशिष्ट पद्धतीने इंजेक्‍शनद्वारे उपलब्ध करून देता येते. 

क्‍यूआर 678 हे केसांच्या वाढीसाठी आवश्‍यक घटक त्वचेत असतात. त्यांच्यामुळे केसांची वाढ होत असते. ज्यांचे केस गळतात, त्यांच्यात प्रदूषण, अनुवांशिक कारणे किंवा अन्य कारणांमुळे या घटकांची संख्या कमी झालेली असते. आमच्या उपचार पद्धतीत हा फॉर्म्युला इंजेक्‍शनद्वारे त्वचेवर सोडून या घटकांची संख्या वाढवली जाते. ते त्वचेत असल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

संशोधनाकरिता 20 ते 25 वर्षे वयोगटातील 20 महिला निवडण्यात आल्या. दर तीन आठवड्यांनी प्रत्येकी आठ सत्रे यानुसार रुग्णांच्या टाळूवर क्‍यूआर 67 हे सोल्यूशन लावण्यात आले. मूल्यमापन करण्यासाठी जागतिक प्रमाणित फोटोग्राफीचा वापर करून आठ सत्रानंतर सुधारणा नोंदवण्यात आली. 20 महिलांमध्ये 11.66 कमी व्हेलस हेअर, 13.77 अधिक टर्मिनल हेअर आढळल्याचे आणि हेअर शाफ्ट व्यास बेसलाईनपेक्षा 2.86 सेमी रुंद असल्याचे दिसून आले. क्‍यूआर 678 हेअर ग्रोथ फॅक्‍टर फॉर्म्युलेशन प्रभावी ठरत आहे, असा निष्कर्ष या संशोधनामार्फत काढण्यात आला. 

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

केमोथेरपीचे दुष्परिणाम होतात; मात्र बरे होण्यासाठी त्यास पर्याय नसतो. याच काळात रुग्ण मानसिक व शारीरिक पातळीवर खचण्याची शक्‍यता असते. डोक्‍यावरील विरळ होत जाणारे केस आणि बारीक होणारे शरीर रुग्णाला अस्वस्थ करते. त्यात रुग्ण महिला असेल तर जास्तच त्रास होतो. या पार्श्‍वभूमीवर क्‍यूआर 678 थेरपी नक्कीच फायदेशीर ठरते. 
- डॉ. देबराज शोम, 
सिनियर कॉस्मेटिक सर्जन, द एस्थेटिक क्‍लिनिक्‍स 

 

कर्करोगावरील उपचारांद्वारे एका टप्प्यापलीकडे केस पुन्हा उगवणे शक्‍य नाही. क्‍यूआर 678 केवळ केसगळती थांबवत नाही, तर नवीन केस उगवण्यासाठी उत्तेजना पुरवते. या उपचार पद्धतीत वाढीसाठी आवश्‍यक असे काही घटक टाळूच्या त्वचेतून इंजेक्‍शनद्वारे दिले जातात. यामुळे आपल्याला हवा तसा आणि प्रभावी परिणाम साधता येतो. जो मूळपेशी किंवा प्लेटलेट समृद्ध प्लाझ्मा (पीआरपी) यांसारख्या तुलनेने निवडीला कमी वाव असलेल्या उपचार पद्धतीत साधता येत नाही. 
- डॉ. रिंकी कपूर, 
त्वचारोग सल्लागार-कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ, द एस्थेटिक क्‍लिनिक्‍स 

 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: QR678 Therapy on hair loss formula that is a boon to patients after chemotherapy