क्वारंटाइन व्यक्तीने पळ काढल्याने गावात धस्स! 

शर्मिला वाळुंज 
रविवार, 5 एप्रिल 2020

डोंबिवलीतील आयरेतील रहिवासी असल्याने नागरिकांमध्ये भिती 

ठाणे ः रात्री हॉस्पिटलमधून पळालेला रुग्ण आपल्या गावात आला आहे का? त्याच्या मित्रांकडे चौकशी करा, त्यांना सांगा घरी आला असेल, तर पालिकेला कळवा, स्वतःशी आणि इतरांच्या जिवाशी खेळू नका, अशी चर्चा सध्या डोंबिवलीतील आयरे गावातील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील क्वारंटाइन व्यक्ती शनिवारी रात्री पळून गेली असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे समजताच शहरात खळबळ उडाली आहे. त्यातच ती व्यक्ती आयरे गावातील असल्याची माहिती पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणीही माहिती लपवून ठेवू नका, तुमच्याकडे ती व्यक्ती आली असल्यास पालिकेला कळवा, असेच सल्ले सध्या समाजमाध्यामावरून दिले जात आहेत. 

कल्याण-डोंबिवलीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली असून काही संशयित व्यक्तींवर येथे उपचार सुरु आहेत. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने एका तरुणास येथे क्वारंटाइन करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्याने रुग्णालयातून पळ काढला. ही क्वारंटाइन व्यक्ती आयरे गावातील असल्याची माहिती थोड्याच वेळात समाज माध्यमावरुन व्हायरल झाल्याने गावात खळबळ माजली आहे.

तो गावातील त्याच्या घरी आला तर, त्याला काही त्रास होत नसेल; परंतू त्याला लागण झाली असेल, तर त्याच्यामुळे इतरांनाही त्रास होईल, अशा चर्चांना रात्रीपासूनच उधाण आले आहे. सकाळीही ज्याच्या-त्याच्या तोंडी हाच विषय आहे. पळालेली व्यक्ती गावात किंवा त्याच्या मित्रांकडे गेला असेल का? मित्रांकडे गेला असेल, तर त्यांनी त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही समाज माध्यमांवरून केले जात आहे. 

ग्रामस्थांची प्रशासनास सहकार्याची तयारी 
पळालेल्या क्वारंटाइन व्यक्तीने काही जणांशी संपर्क साधून शास्त्रीनगर येथे योग्य ती सुविधा नसल्याचे सांगत. मी केवळ बांधित रुग्णणासोबत क्रिकेट खेळताना एकत्र आलो होतो, असे सांगितल्याचीही चर्चा आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून ती व्यक्ती सापडत नाही, तोपर्यंत आयरे गावातील ग्रामस्थांची चिंता कमी होणार नसल्याचे दिसते. त्याने पळून जायला नको होते. त्याला लागण झाली किंवा नाही; परंतू आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. तो गावात आला असल्याचे समजले, तर नक्कीच आम्ही प्रशासनास त्याची माहिती देऊ, असे आयरे ग्रामस्थांनी सांगितले.  

हे काय...
कोरोनामुळे साडेआठ पोलिसांचे सुटीसाठी अर्ज

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarantine person ran from hospital in thane