महिला सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

मुंबईत सात महिन्यांत बलात्काराचे 583 गुन्हे 

मुंबई : जालन्यातील 19 वर्षांच्या मुलीवर चेंबूर येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत दररोज एकापेक्षा जास्त महिला व मुलीवर बलात्कार होत असल्याचे भयावह वास्तव गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून समोर येते.

मुंबईत यावर्षी जुलैपर्यंत बलात्काराचे 583 गुन्हे दाखल झाले आहेत. 
मुंबईत जुलैपर्यंत बलात्काराचे 583 गुन्हे दाखल झाले; 2018 मध्ये याच कालावधीत बलात्काराचे 505 गुन्हे दाखल झाले होते. यावर्षी मुंबईत विनयभंगाचे 1546 आणि अपहरणाचे 802 गुन्हे घडले. त्याशिवाय महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 796 गुन्हे नोंदवण्यात आले. अल्पवयीन मुलांबाबतच्या गुन्ह्यांची स्थिती गंभीर आहे.

महिला व बालकल्याण विभागाने पुरस्कृत केलेल्या व युनिसेफच्या मदतीने प्रयास या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील 50 टक्के मुलांना लैंगिक अत्याचाराच्या घटनांना सामोरे जावे लागते. सर्वांत गंभीर बाब म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार, देशातील बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांपैकी 94.8 टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपी परिचित असल्याचे समोर आले आहे. 
लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे यापूर्वी भारतीय दंड विधानातील कलमांनुसार दाखल करण्यात येत होते. त्यात विनयभंग (क्र. 354) आणि बलात्कार (क्र. 376) या कलमांचा समावेश होता. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. 

बालकांवरील अत्याचारांत वाढ 
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2014 मध्ये देशात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 8904 गुन्हे दाखल झाले होते. 2015 मध्ये देशभरात अशा 14 हजार 913 गुन्ह्यांची नोंद झाली. असे सर्वाधिक गुन्हे मध्य प्रदेशात घडले असून, महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत पीडित अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या एका खासगी संस्थेकडे आलेल्या 644 प्रकरणांमधील 52 टक्के पीडित मुले 11 ते 18 वर्षे वयोगटातील असल्याचे समोर आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The question of women's safety is on the horizon again