राज्यातील अनधिकृत स्कूल व्हॅन-बस आरटीओच्या रडारवर 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 12 जानेवारी 2020

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) अनधिकृत स्कूल व्हॅन आणि बसगाड्यांची विशेष तपासणी मोहीम दुसऱ्यांदा हाती घेतली आहे

मुंबई : राज्य परिवहन विभागाने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2019 मध्ये अनधिकृत स्कूल व्हॅन आणि बसगाड्यांवर कारवाई केली होती. अशा वाहनांची तपासणी नियमितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) अनधिकृत स्कूल व्हॅन आणि बसगाड्यांची विशेष तपासणी मोहीम दुसऱ्यांदा हाती घेतली आहे. ही मोहीम 14 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

महत्वाचं - ... या रूग्णालयात झाली डॉक्टरला मारहाण

अनधिकृत स्कूल व्हॅन आणि बसगाड्यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या होत्या. त्यावरून राज्य परिवहन विभागाने अनधिकृत स्कूल व्हॅन-बस आणि विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक, स्कूल बस परवान्यातील अटींचे आणि नियमावलीतील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित परवानाधारक स्कूल व्हॅन-बसवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

अन् 10 वर्षानंतर दाखल झाला विनयभंगाचा गुन्हा 

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाच्या परवान्याची वैधता, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा, अग्निशमन यंत्रणा, परवाना, आसन क्षमता आदी बाबींची तपासणी करण्यात येईल. या अटी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल व्हॅन-बसवर कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले. दुचाकी वाहनांवरून नेले जाणारे विद्यार्थी आणि चालक विनाहेल्मेट असल्याच कारवाई केली जाईल. शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षांनाही चाप लावण्यात येणार आहे. या कारवाईचा अहवाल 15 जानेवारीला पाठवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. 

 

परिवहन विभागाच्या आदेशावरून सर्वत्र स्कूल व्हॅन आणि बसची तपासणी केली जात आहे. दुचाकीवरून विनाहेल्मेट आणि रिक्षातून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल. परिवहन विभागाचे नियम न पाळणाऱ्या स्कूल व्हॅनवरही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी 14 जानेवारीपर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, नियमित कारवाई सुरूच राहील. 
- बी. जी. खंडागळे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the radar of an unofficial school van-bus RTO