
Raigad News: जिल्ह्यात बेसुमार उत्खनन्नामुळे धोका; उपाययोजनांवर भर
Raigad News : जिल्ह्यात झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचे घातक परिणाम वातावरणावर होत असल्याचे दिसत आहे.
विविध प्रकल्पांसाठी होणारी बेसुमार झाडांची कत्तल, मोठ्या प्रमाणात सुरू असलेले उत्खननामुळे एकीकडे जिल्ह्यामध्ये पूर, दरड कोसळण्याचा धोका वाढत चालला आहे; तर दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या नवीन संकटांबाबत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यावरील एकापोठापाठ नैसर्गिक संकटांची मालिका सुरू आहे. जिल्ह्यातील पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, कर्जत, महाड, पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांमध्ये निर्माण झालेली पूर परिस्थिती आगामी काळातील मोठ्या संकटांची चाहूल देत आहेत.
अशातच जिल्ह्याला तौत्के चक्री वादळाचा बसलेला फटका आणि त्यानंतर २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील अनेक गावांसह परिसरातील वाड्यांचे दरड कोसळून झालेले नुकसान यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे नवे संकट उभे टाकले आहे.
विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात होत असलेल्या उत्खननामुळे तर अनेक ठिकाणी केल्या जाणाऱ्या मातीच्या भरावामुळे पावसाळ्यात पाणी जाण्याचा मार्ग बदलला जात आहे.
या प्रकारांमुळे अलिबाग, कर्जत, पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांना या पुराचा फटका बसला आहे. माती उत्खननामुळे जमिनीची धूप होण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोलही दिवसेंदिवस बिघडत आहे.
त्याचा मानवी आरोग्यासह जंगलातील पशू, पक्ष्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती आहे. तसेच दरड कोसळण्याबरोबरच वारंवार निर्माण होणारी पुराची परिस्थिती भविष्यात नवीन संकटांचे संकेत देत आहे.
तापमानवाढीबाबत पथनाट्यातून जनजागृती
जिल्ह्यातील वाढते तापमान रोखण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने व प्रिझम सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. पथनाट्याच्या माध्यमातून समुद्रकिनारी प्रदूषणामुळे होणारे परिणामाची माहिती देण्याचे काम केले जात आहे.
तसेच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाबरोबरच ई-वाहनांचा वापर, प्लास्टिकऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करायला पाहिजे, असे संदेश पथनाट्यातून जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी देण्यात येत आहेत.
वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वृक्षारोपण काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाची आहे. त्यामुळे पथनाट्याच्यातून जनजागृती सुरू आहे.
- प्रसाद गायकवाड, वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण अलिबाग