Raigad : वीटभट्टीवर शिक्षणाचा श्रीगणेशा

नेरळमधील भाविकाच्या जिद्दीला सलाम
भाविका भगवान जामघरे
भाविका भगवान जामघरेsakal

नेरळ : कर्जतमधील दुर्गम भागात राहणारे आदिवासी, कातकरी समाजातील कुटुंबे वीटभट्टी कामगार म्हणून कायम स्थलांतर करीत असतात. परिणामी त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेरळ बिरदोलेतील बारावीत शिकणाऱ्या भाविका भगवान जामघरे हिने ‍पुढाकार घेतला आहे. तिने वीटभट्टीवरच शाळा सुरू केली असून सध्या ४५ मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे सहा मुले आज आश्रमशाळेत आपले शिक्षण घेत आहेत.

शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. मात्र दरवर्षी पावसाळा संपला की वीटभट्टी कामगार स्थलांतर करतात. त्‍यांच्याबरोबरचे त्यांची मुलेही स्थलांतरित होत असल्‍याने शिक्षणापासून वंचित राहतात. शासनाने शाळाबाह्य मुलांसाठी शोध मोहीम सुरू केली असली तरी अनेकदा वीटभट्टी लांब असल्याने मुले शाळेत जाण्यासाठी निरुत्साही दिसून येतात.

नेरळपासून दामत गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक वीटभट्ट्या आहेत. या भागातून प्रवास करताना बिरदोलेतील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या भाविकाला वीटभट्टीवर लहान मुले खेळताना अथवा आईवडिलांच्या कामात मदत करताना दिसली.

या मुलांच्या शिक्षणाची चिंता तिला गप्प बसू देत नव्हती. व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्‍या वडिलांकडे तिने वीटभट्टीवरील मुलांच्या भविष्‍याबाबत शिकवणी वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्‍यानुसार अल्‍प उत्‍पन्न असूनही त्‍यांनी पाटी, पेन्सिल, पुस्‍तके खरेदी करून १४ नोव्हेंबर २०२१ मध्ये बालदिनी अनौपचारिक शाळा सुरू केली.

दामत येथील वीटभट्टी मालकांनीही सर्व शाळाबाह्य मुलांना एकत्र करण्यासाठी मदत केली शिवाय शाळेसाठी एक खोलीही उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला २५ मुलांनी सुरू झालेल्‍या शाळेत आज ४५ मुले शिक्षण घेत आहेत. मुलांना शिकवण्यासाठी भाविकाने त्‍यांची बोली भाषाही आत्‍मसात केली आहे.

भाविकाने वीटभट्टीवरील मुलांना शिकवण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. जागा मिळाली, शाळा सुरू झाली. वीटभट्टीवरील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, सुशिक्षित पिढी घडवण्यात आमचाही हातभार लागतो आहे.

- भगवान जामघरे, भाविकाचे वडील

भाविकाताई खूप चांगल्‍या पद्धतीने शिकवते. गाणी-गोष्‍टी, खेळाच्या माध्यमातून ती आमचा अभ्‍यास करून घेते. त्‍यामुळे मी खूप शिकणार आहे. मोठ्या शाळेत जाणार आहे.

- गौरी कृष्णा वाघे, विद्यार्थिनी

आम्हाला शिकता आले नाही आणि मुलांना पण शिकवता येत नव्हते. पण भाविकाने आमच्या मुलांसाठी वीटभट्‌टीवर शाळा सुरू केली. त्‍यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. मुले शिकतात हे पाहून आम्‍हालाही बरे वाटते.

- संतोष वाघमारे, वीटभट्टी कामगार

मुलांनी शिकावे, मोठे व्हावे, असे प्रत्‍येक आईवडिलांना वाटते. पण वीटभट्टी कामगार असल्‍याने काम मिळेल तिथे जावे लागते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात बाधा येते. भाविकाने शाळा सुरू केल्‍यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. आता त्‍यांना चांगले शिक्षण देऊ.

- राजेश हिलम, वीटभट्टी कामगार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com