श्रीवर्धन मतदारसंघात उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका 

प्रश्‍नपत्रिका
प्रश्‍नपत्रिका


श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील प्रश्‍नांवर कोणताही उमेदवार स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. येथील मतदारसंघातील रोजगार, रस्ते, आरोग्य, शैक्षणिक, वाहतूक कोंडीचे प्रश्‍न आजही कायम आहेत. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्‍यातील युवा एकता प्रतिष्ठानच्या तरुणांनी एकत्र येत उमेदवारांसाठी प्रश्‍नपत्रिका तयार केली आहे. ही प्रश्‍नपत्रिका सामाजिक माध्यमाद्वारे व प्रत्यक्षरित्या भेट घेऊन उमेदवारांना वाटण्यात येत आहे. 

श्रीवर्धन तालुक्‍यात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. श्रीवर्धन, म्हसळा सरकारी रुग्णालयात सोनोग्राफी तपासणी सुविधा नसल्याने त्याचा सर्वाधिक फटका गर्भवतींना बसत आहे. सरकारी रुग्णालयात रक्‍तपेढीची आवश्‍यकता असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रांत कर्मचाऱ्यांचा अभाव, तसेच ऑक्‍सिजनची सुविधा नसल्याने सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुक्‍यातील क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत आहे. वांजळे गावाजवळील मदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी अजूनही प्रयत्न झालेले नाहीत. श्रीवर्धन एसटी डेपोची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे एसटी डेपोच्या सुधारणेसाठी आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले आहेत, असा सवाल या प्रश्‍नपात्रिकेच्या माध्यमातून उमेदवारांना विचारण्यात आला आहे.

महावितरणच्या कामाबद्दल अनेक तक्रारी आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष आहे. यावर तोडगा काढण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आल्याने यावर प्रश्‍नपात्रिकेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी काय संकल्पना आहे. क्रीडा क्षेत्रातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी कोणते प्रयत्न करता येईल, याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुचविण्यात आले आहे. 


तरुणांना प्रशिक्षणाची गरज 
दिघी पोर्टमधील नोकऱ्यांसाठी स्थानिक तरुणांचा विचार व्हायला व्हावा. त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवे, असे या प्रश्‍नपत्रिकेच्या माध्यमातून सुचविण्यात आले आहे. श्रीवर्धन, म्हसळा तालुक्‍यात एमआयडीसी स्थापन झाल्यास स्थानिकांना रोजगार देण्यासाठी काय नियोजन आहे, याबाबत लोकप्रतिनिधींना युवा एकता प्रतिष्ठानच्या तरुणांनी प्रश्‍न विचारला आहे. तसेच भरडखोल, आदगाव, दिघी गावात मच्छीमारांसाठी भविष्यात कोणते व्यवसाय उभारता येऊ शकतात, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. 

पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष 
हरिहरेश्‍वर ते दिघीपर्यंत अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. त्यांच्या विकासाबाबत काय नियोजन आहे, याकडे प्रश्‍नपात्रिकेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. तालुक्‍यातील पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गावातील स्थानिक घरगुती उद्योगाला कशाप्रकारे प्रोत्साहन देता येईल, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर काही मदत घेता येईल, यासाठी प्रयत्न होण्याची आवश्‍यकता असल्याचे सुचविले आहे. 


राजकारणाची झालेली दशा बदलून नवी दिशा देण्यासाठी सदरची प्रश्‍नपत्रिका तयार केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असा प्रयोग होत असावा. येणाऱ्या काळातदेखील शिक्षण, रोजगार, मूलभूत सेवा-सुविधांसाठी युवा एकता प्रतिष्ठानतर्फे आमदारांकडे पाठपुरावा करण्यात येईल. यापुढे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना अशाच प्रकारची प्रश्‍नपत्रिका असणार आहे. 
सुमित सावंत, सदस्य, युवा एकता प्रतिष्ठान 

तालुक्‍यातील क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडणार कसे? निवडून येणाऱ्या आमदारांनी शालेय स्तरापासून विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत. 
वैभव कदम, कबड्डी खेळाडू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com