खोपोलीतील नाट्यवैभव दुर्लक्षित 

नाट्यगृह खोपोली
नाट्यगृह खोपोली

खोपोलीः शाहू महाराज सामाजिक सभागृह व नाट्यगृह संकुल हे शहराचे वैभव आहे; मात्र नियमित दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सभागृहाची दुरवस्था होत आहे. त्यामुळे नाट्यकर्मी, सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. 

पंधरा वर्षे रखडलेले हे नाट्यगृह व सामाजिक सभागृह संकुल सप्टेंबर 2016 मध्ये पूर्णत्वास आले. तत्कालीन नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांच्या नेतृत्वाखाली व माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नाट्यगृहाचे शानदार उद्‌घाटन झाले. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या नाट्यगृहात भव्य रंगमंचासह 580 आसन व्यवस्था, डिजिटल साऊंड सिस्टीम व वीज व्यवस्था आहे. आलेल्या कलाकारांसाठी आरामकक्ष, पुरुष व महिलांना मेकअप रूम, स्वच्छतागृहे, व्यवस्थापन कार्यालय व सुंदर अशी भव्य गॅलरी आहे.
 
मागील दोन वर्षांपासून हे नाट्यगृह व सभागृह संकुल पालिकेकडून खासगी ठेकेदार कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आले. त्यानुसार व्यावसायिक प्रयोगासाठी 20 हजार, राजकीय, संस्था कार्यक्रमासाठी 15 हजार व सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमासाठी 10 हजार प्रती कार्यक्रम असे भाडेदर निश्‍चित केले आहेत. यात पायाभूत दुरुस्तीची कामे करण्याची जबाबदारी पालिकेकडे असल्याचे सांगितले जात आहे.
 
सद्यस्थितीत नाट्यगृहात अनेक दुरवस्था निर्माण झाल्या आहेत. मेकअप रूम, आरामकक्षाचे छत कोसळले आहे. येथील पंखे मोडकळीस आले असून, वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. किमती फर्निचरची मोडतोड झाली आहे. येथील स्वच्छताही दुर्लक्षित बनली आहे. वीजपुरवठा बिल वेळेवर भरणा होत नसल्याने अनेक वेळा वीज खंडित केली जात असल्याने ही समस्या सततची बनली आहे. किमती साहित्य अस्ताव्यस्त झाले आहे. अनेक दरवाजे व खिडक्‍या तुटलेल्या आहेत. त्यांची डागडुजी होण्याबाबत ठेकेदार कंपनी पालिकेकडे तर पालिका प्रशासन ठेकेदाराकडे बोट करीत असल्याने सद्यस्थितीत सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत असल्याने दुरवस्था वाढली आहे. दुसरीकडे शहरातील नाट्यकर्मी, जागृत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. 

पालिकेकडून दखल घेण्यात आली आहे. या संबंधात प्रस्ताव तयार होत आहे. लवकरच डागडुजी व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधित ठेकेदारांनाही लहान-सहान दुरुस्त्या व गैरसोई दूर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. 
- सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली 

नाट्यगृह खोपोली शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. त्याची अशी दुरवस्था होणे कष्टदायक आहे. आम्ही या संबंधात पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. पालिका प्रशासन तातडीने डागडुजी व दुरुस्ती करेल अशी अपेक्षा आहे. 
- प्रवीण पुरी, नाट्यकर्मी, खोपोली 

शाहू महाराज नाट्यगृहामधील समस्या व दुरवस्थेबाबत पालिका प्रशासनास व जबाबदार लोकप्रतिनिधींना सर्व माहिती आहे; मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दर महिन्याला सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या सांस्कृतिक कार्य निधीतून या नाट्यगृहाची नियमित डागडुजी व दुरुस्ती होणे आवश्‍यक असताना असे होताना दिसत नाही. 
- प्रशांत कुलकर्णी, नाट्यप्रयोग आयोजक, खोपोली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com