टवाळखोरांना रोखण्यासाठी कर्जतमध्ये नाकाबंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कर्जत पोलिस मैदानात भाज्यांची दुकाने लावण्यात आली असून, प्रत्येक भाजी विक्रेत्याला विशिष्ट लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. नागरिकांनीही भाजी खरेदीसाठी या दिलेल्या चौकटीतील रांगेत उभे राहून ठराविक अंतर राखून भाजी खरेदी करण्यास सांगितले जात आहे.

मुंबई - संचारबंदी लागूनही कर्जत तालुक्‍यात नागरिकांचा मुक्त संचार सुरू असल्याने अशा टवाळखोरांना रोखण्यासाठी कर्जत पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. जे कामाविना रस्त्यावर फिरत आहेत त्यांना अटकाव केला जात आहे.

लढा कोरोनाशी...
 
कर्जत पोलिस मैदानात भाज्यांची दुकाने लावण्यात आली असून, प्रत्येक भाजी विक्रेत्याला विशिष्ट लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. नागरिकांनीही भाजी खरेदीसाठी या दिलेल्या चौकटीतील रांगेत उभे राहून ठराविक अंतर राखून भाजी खरेदी करण्यास सांगितले जात आहे. यावर नगरसेवक बळवंत घुमरे लक्ष ठेवून आहेत. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवस घराबाहेर पडू नका. आपल्या कुटुंबाबरोबर घरातच राहा. फक्त अत्यावश्‍यक सेवेचा लाभ घ्या. जास्तीत जास्त गर्दी टाळा, असे आवाहन कर्जत पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्‍यातून तसेच कर्जत शहरातून अत्यावश्‍यक सेवेची दुकाने सुरू आहेत. त्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्जत पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. चौकशी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे वाहने कर्जतमधून बाहेर जाऊ दिले जात नाही. तसेच बाहेरून कर्जतमध्ये येणारी वाहनांची चौकशी केल्याशिवाय सोडत नाही. काही दिवस बाहेरचे नागरिक अथवा पाहुणे गावामध्ये येऊ नयेत. कोरोनाची बाधा नको व्हायला म्हणून काही गावांमधून गावच्या प्रवेशद्वारावर चक्क मोठमोठे दगड तसेच झाडे आडवी टाकून रस्ते अडवले जात आहेत. श्रीराम पुलावर नाकाबंदी वेळी कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर, एपीआय दीपक जोगदंड आदी पोलिस पथक कार्यरत होते. 

कुठल्याही प्रकारची वाहने चौकशी केल्याशिवाय सोडत नाही; परंतु काही जण अशी आहेत की आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. आम्हाला औषधे घ्यायची आहेत. काही जणतर जुन्या हॉस्पिटलच्या फायली दाखवत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ चौकशीत जात आहे. नाकाबंदी केल्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे. 
- अरुण भोर, पोलिस निरीक्षक, कर्जत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-no entry# public