
Raigad : पालीमध्ये बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव
पाली : श्री बल्लाळेश्वराचा माघ मासोत्सवाला सुरुवात झाली असून गुरुवारपर्यंत (ता.२६) पालीतील वातावरण चैतन्यपूर्ण राहणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक गणरायाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पालीत येतात. मासोत्सवासाठी पाली नगरी सजली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. यानिमित्त पालीत मोठी जत्राही भरली आहे.
भाविकांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने उपाययोजना केल्या आहेत. याबाबत तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. तहसीलदारांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तसेच बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून नियोजनाची माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या.
शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली. राज्य परिवहन मंडळाकडून अतिरिक्त गाड्यांची सोय करण्यात आली असून त्याचे आरक्षणासाठी पाली बसस्थानक तसेच मंदिर परिसरात विशेष व्यवस्था केली आहे. मंदिर प्रशासन तसेच पाली नगरपंचायतकडून यात्रेकरूंच्या सोयीसाठी तसेच परिसरात स्वच्छता राहावी म्हणून जागोजागी कचराकुंड्या ठेवल्या आहेत.
वाहतूक व्यवस्था
उत्सव काळात पालीतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. मोठ्या वाहनांची वाहतूक गावाबाहेर थांबविण्यात आली आहे. त्याबरोबर उंबरवाडी येथे तसेच वाकणच्या दिशेने धारिया यांच्या जागेत आणि झाप गावाकडे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून भाविकांना आणण्यासाठी रिक्षांची मोफत सुविधा करण्यात आली आहे.
मंदिरात दर्शन मंडपाची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन वाहन, पाण्याचे टँकर, जनरेटर याची देखील सोय करण्यात आली आहे. पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला आहे.
- जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट