हेल्पलाईन वरील तक्रारींची रेल्वेकडून दखल  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway-helpline

हेल्पलाईन वरील तक्रारींची रेल्वेकडून दखल 

मुंबई - लोकलने प्रवास करणाऱ्या विसरभोळ्या प्रवाशांचे तब्बल दोन कोटी आठ लाखांच्या वस्तू रेल्वे पोलिसांनी परत केल्या. मोबाईल, सोने, लॅपटॉप आदींसह रोख रक्कम हरवल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. गेल्या वर्षात रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईनवर सहा बॉम्ब ठेवल्याचे निनावी दूरध्वनी आल्याची नोंद आहे. 

शहरवासीयांची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवासादरम्यान गर्दीमुळे किंवा अन्य कारणामुळे प्रवासी वस्तू विसरतात. विसरलेल्या वस्तूंसाठी रेल्वे पोलिसांनी 9833331111 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. हरवलेल्या वस्तूबाबत हेल्पलाईनवर माहिती दिल्यावर ते संबंधित रेल्वेस्थानकावरील पोलिसांना कळवतात. त्यानंतर प्रवाशाच्या वस्तू मिळवून त्या त्यांना परत केल्या जातात. अपर पोलिस महासंचालक (रेल्वे) डी. कन्नकरत्नम यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पलाईन सुरू आहे. काही प्रवासी किरकोळ वस्तू हरवल्याच्या तक्रारीही हेल्पलाईनवर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने हेल्पलाईनवर फोन करून मुलाचे शाळेचे बूट आणि मोजे विसरल्याची तक्रार केली होती. सामान न मिळाल्यास पुन्हा फोन करून पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत प्रवाशांकडून अश्‍लील टिप्पणीही केली जात असल्याची उदाहरणे आहेत. रेल्वे पोलिसांनी यंदाच्या वर्षात तब्बल दोन कोटी 8 लाख रुपयांचे सामान प्रवाशांना ओळख पटवून परत केले आहेत. 

पोलिसांची कामगिरी 
* हरवलेल्या बॅगबाबत 12 हजार 921 कॉल आले. त्यापैकी दोन हजार 783 बॅगांचा पोलिसांनी शोध लावला 
* 80 लाख 48 हजारांचे 206 लॅपटॉप परत 
* 26 लाख 60 हजार 580 रुपयांचे सोने हरवल्याच्या तक्रारी 
* 20 लाख 88 हजारांचे 205 महागडे मोबाईल प्रवाशांना परत 
* वैद्यकीय मदतीच्या 1020 कॉलची नोंद 
* महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांच्या तक्रारीचे 441 कॉल्स. त्यापैकी 95 जणांवर पोलिसांची कारवाई 
* संशयित व्यक्ती दिसल्याचे 127 फोन 
* संशयित बॅग-वस्तू असल्याचे 825 कॉल 
* महिलांच्या डब्यात वस्तू विकणाऱ्या 87 जणांवर पोलिसांची कारवाई