बारवी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; बारवी धरण भरून वाहण्याच्या तयारीत

आहुती त्रिवेदी
Saturday, 29 August 2020

बारवी धरणात शुक्रवारी (28 ऑगस्ट) दुपारी 3 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 71. 95 मीटर इतकी झाली आहे. धरणातील स्वयंचलित गेट बंद करून 72. 60 मीटर म्हणजे 340. 48  द.ल.घ.मीटर क्षमतेने पाणी साठवण करण्यात येणार आहे.

बदलापूर (मुंबई) : दोन दिवसांच्या काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आज पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या पावसामुळे बारवी धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. धरण कोणत्याही वेळी भरून वाहू लागण्याची शक्यता असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा आपत्ती प्रशासनाने धरण क्षेत्रातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बारवी धरणात शुक्रवारी (28 ऑगस्ट) दुपारी 3 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 71. 95 मीटर इतकी झाली आहे. धरणातील स्वयंचलित गेट बंद करून 72. 60 मीटर म्हणजे 340. 48  द.ल.घ.मीटर क्षमतेने पाणी साठवण करण्यात येणार आहे. धरणाच्या पाण्याची पातळी 72. 20 ते 72.60 मीटर पातळीवर आल्यानंतर धरणाच्या स्वयंचलित गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरु होईल.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. परिणामी बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बारवी नदी काठी असलेल्या अस्नोली, रहाटोली, चोण, सांगाव, चांदप, कारंद, पिंपलोळी, चांदप पाडा, पादीर पाडा, पाटील पाडा आदी नदी ठिकाणच्या नागरिकांना सावध रहाण्याचा इशारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण उपअभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यानी दिला आहे.

या काळात नागरिकांनी वाहत्या पाण्यात न जाण्याचा तसेच सतर्क रहाण्याचा इशारा सर्व ग्रामपंचायत सरपंचांना कळविले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला सुद्धा सतर्क रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rains have raised the water level of Barvi Dam