राज ठाकरे प्रचाराला आले खरे पण लक्ष्मण जगतापांना त्याचा तोटाच झाला

लक्ष्मण जगताप राज ठाकरे
लक्ष्मण जगताप राज ठाकरे esakal

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनारुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर बाणेर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी सध्या राज्यातील अनेक नेत्यांची रूग्णालयात रिघ लागली आहे. त्यात भाजपमधील अनेक बड्या नेत्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील रूग्णालयात हजेरी लावली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत अनेकांचा समावेश आहे. लक्ष्मण जगताप यांची लोकप्रियता, त्यांच्या बद्दल असलेलं वलय यामुळे त्यांच्यासाठी राजकीय वैर, पक्षीय मतभेद देखील बाजूला पडताना दिसलं आहे.

कोण आहेत हे लक्ष्मण जगताप? पिंपरी चिंचवडचे अनभिषक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना स्पष्टवक्तेपणामुळे राजकारणातील हेडमास्तर असच म्हटलं जातं. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडचा करभार त्यांनी अनेक वर्षे एकहाती आपल्या हाती सांभाळला. ३५ वर्षे ते राजकारणात आहेत. १९८६ ते २००६ अशी सलग वीस वर्षे पिंपरी-चिंचवड पालिकेत ते नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समिती अध्यक्ष, तर २००२ ला महापौर झाले. लक्ष्मण जगताप हे सुरवातीच्या काळापासूनच अजित पवार यांचे खंदे समर्थक होते मात्र आघाडीमधून तिकीट न मिळाल्यामुळे २००९ साली चिंचवड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडून देखील आले. निकालानंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पुनरागमन केलं. आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध जोरदार बंड करणे ही लक्ष्मण जगताप यांची खासियत होती. मग समोर कितीही मोठा नेता का असेना.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला. अनधिकृत बांधकामे, रेडझोन, शास्तीकर, पूररेषा, साडेबारा टक्के परतावा यासारखे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊनही आघाडी सरकारने पाळले नाही, जनतेची कामे न करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी स्वीकारणार नसल्याचं सांगत लक्ष्मण जगतापांनी त्या मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांनी पाठिंबा जाहीर करत आपल्या पक्षात घेतलं.अजित पवारांचे समर्थक असलेल्या लक्ष्मण जगताप यांच्या शेकाप कडून घेतलेल्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायची खलबतं सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांकडून सुरु झाली.

विद्यमान खासदार असूनही शिवसेनेने गजानन बाबर यांचं तिकीट कापलं आणि श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. तर तिकडे अजित पवारांनी सेनेचे प्रवक्ते असणाऱ्या राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीमध्ये आणून मावळ मध्ये उभं केलं. एकंदरीत जंगी लढत सुरु झाली. पण पारडं मात्र लक्ष्मण जगताप यांच्याकडेच झुकलं असल्याची चर्चा राजकीय पंडितांमध्ये होती. अशातच एंट्री झाली चौथ्या खिलाडूची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

लक्ष्मण जगताप राज ठाकरे
भाजप आमदार लक्ष्मण जगताप रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

त्याकाळात मनसेचं मावळ मतदारसंघात वजन वाढत चाललं होतं. २००९ सालच्या निवडणुकीमध्ये मावळात मनसेचा उमेदवार रिंगणात नव्हता, त्याचा थेट फायदा शिवसेनेला झाला होता . त्यामुळेच २०१४ मध्ये मावळ लोकसभा मतदार संघामधून आपला उमेदवार उभा करायचं राज ठाकरे यांनी ठरवलं. त्यासाठी पहिला ऍप्रोच केला शिवसेनेतून नाराज झालेल्या गजानन बाबर यांना.पण पक्षनेतृत्वाशी मतभेद असले तरी सेनेला जय महाराष्ट्र म्हणण्यास गजानन बाबर तयार नव्हते. अखेर अनेक चर्चा व बैठकांनंतर राज ठाकरे यांनी मावळमध्ये लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. फक्त पाठिंबा जाहीर केला नाही तर राज ठाकरे स्वतः लक्ष्मण जगताप यांच्या साठी प्रचारसभा घेणार असं जाहीर करण्यात आलं.

शेकाप व मनसेच्या पाठिंब्यामुळे पनवेल, उरण, कर्जत भागातील ७० टक्के मतदान लक्ष्मण जगताप यांना मिळणार असल्याचं बोललं गेलं. शिवाय पिंपरी चिंचवड भागात असलेल्या वर्चस्वामुळे मावळ मतदारसंघातून ते सर्वाधिक मताधिक्क्य़ाने विजयी होतील अशी भविष्यवाणी सुरु झाली.

लक्ष्मण जगताप यांची बंडखोरी राष्ट्रवादीने प्रचंड गंभीरपणे घेतली. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ‘हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि मगच पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवा,’ असे आव्हान लक्ष्मण जगताप यांना दिले. हे आव्हान स्विकारत जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. एकूणच मावळ लोकसभा निवडणुकीची लढत हायव्होल्टेज होणार याची चुणूक दिसू लागली होती.

सगळ्यांचं लक्ष लक्ष्मण जगताप यांच्यासाठी राज ठाकरे प्रचारसभा घेणार का याकडे लागून राहिलं होतं. राज यांनी आजवर अनधिकृत बांधकामांविरुद्ध व बिल्डरलॉबी विरुद्ध रोखठोक भूमिका घेतली होती. यापूर्वी सभेत बोलताना त्यांनी आपली सत्ता आली तर अशी बांधकामे करणाऱ्या बिल्डरांना तुरुंगात पाठवू, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता जगताप यांच्या सभेत ते काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता लागली होती. राज यांची ठाकरी वक्तृत्वशैली, तरुणांच्यात असलेली क्रेझ यामुळे जगताप यांना निश्चितच फायदा होणार होता. म्हणूनच ते आपल्या पत्रकारपरिषदेमध्ये राज ठाकरे दोन ते तीन सभा घेणार असल्याचं सांगत होते. पण राज यांचे वेळापत्रक प्रचंड व्यस्त होते. अनेक ठिकाणी सभा होत होत्या. शेकापच्या उमेदवारासाठी ते का सभा घेतील असंही अनेकांना वाटत होतं.

लक्ष्मण जगताप राज ठाकरे
Video: ... तर ३ मे नंतर त्यांना जश्यास तसं उत्तर देऊ - राज ठाकरे

मात्र दिलेला शब्द पूर्ण करणारच असं म्हणत राज ठाकरे यांनी पनवेल येथील खांडेश्वर येथे प्रचारसभा आयोजित केली. संध्याकाळी ६ वाजता ही सभा होणार होती. कोकण ते घाट सर्वभागातून शेकाप, मनसेचे हजारो कार्यकर्ते गाड्या भरून या सभेला हजर झाले. लाखोंची गर्दी अगदी वेळेवर जमा झाली होती. पण दुर्दैवाने काही कारणामुळे राज ठाकरेंना सभास्थानी येण्यास उशीर होऊ लागला. त्यांच्या सभेला प्रशासनाकडून ६ ते १० इतकीच वेळ देण्यात आली होती. जसा जसा घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला तस तसे कार्यकर्त्यांची चुळबुळ वाढू लागली. राज ठाकरे येणारच नाहीत अशा वावड्या देखील उठू लागल्या. उपस्थित नेतेमंडळींना देखील टेन्शन आलं.

६ वाजताच्या सभेला साधारण १० वाजून १० मिनीटांनी राज ठाकरे हजर झाले. अक्षरशः दोन वाक्यात त्यांना सभा आटोपती घ्यावी लागली. विरोधकांनी राज ठाकरे यांचा पनवेलमध्ये फ्लॉप शो म्हणून हिणवलं. त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला गेला.

दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्यासाठी प्रचारसभा घेतली ती जोरदार रंगली. पण अनधिकृत बांधकामावर बोलताना राज ठाकरे यांना चांगलीच कसरत करावी लागली. तसंही चिंचवड हा लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला होता, त्यांच्यासाठी राज यांची पनवेलमधली सभा महत्वाची होती. राज यांनी पनवेलमध्ये पुन्हा प्रचार करण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते काही पूर्ण करता आलं नाही. याचा फटका लक्ष्मण जगताप यांना बसला. वरून आचारसंहिता मोडल्याबद्दल शेकाप नेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

पनवेल भागातून अपेक्षित मताधिक्य लक्ष्मण जगतापांना मिळालेच नाही. याचा फायदा सेनेच्या श्रीरंग बारणे यांना झाला. राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकर यांनी देखील लक्ष्मण जगताप यांच्या मतांना मोठा खिंडार लावला. याचाच परिणाम लक्ष्मण जगताप यांचा दारुण पराभव झाला. अजित पवार यांचा हुकुमाचा एक्का म्हणवले जाणारे लक्ष्मण जगताप पुढे राष्ट्रवादी पासून कायमचे दूर झाले. त्यांनी त्यावर्षी भाजपमध्ये प्रवेश केला व विधानसभा जिंकली. पुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपच्या हातात येण्यास देखील तेच कारणीभूत ठरले. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं नाही, त्यांना राज्यात देखील मंत्रिपदाने हुलकावणीच दिली.

आजही पिंपरी चिंचवड भागात कार्यकर्त्यांचं सर्वात मोठं जाळं लक्ष्मण जगताप यांचं आहे मात्र त्यांचं खासदारकीच स्वप्न मात्र अजूनही अपूर्णच राहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com